जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून लौकिक असलेल्या ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, त्यातच नगर पंचायतचा दर्जा मिळाल्याबाबतची उद्घोषणा झाल्याने सावळा गोंधळात नशिराबादकर मात्र अजूनही संभ्रमात आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू
सध्या तरी ग्रामपंचायतची निवडणूक होणार अशा चर्चा रंगत आहे. ग्रामपंचायत निवडणूक स्थगितीबाबत अद्याप कुठलाही शासकीय निर्देश नसल्याचे सांगण्यात येते त्यामुळे ग्रामस्थ संभ्रमात आहे.
ग्रामपंचायत निवडणूक म्हटली म्हणजे लाखो रुपयांची उधळण. प्रचार, पार्टी तर कोणाची मर्जी सांभाळून ठेवण्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा होतो. पण निवडणूक होणार की नाही, त्यातच नगर पंचायत मंजूर झाली. म्हणजे पुन्हा येत्या काही महिन्यानंतर निवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशा द्विधास्थितीमुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. नाचरे मोरा आंब्याच्या वनात.. नाच अशी स्थिती झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शासनाने नगरपंचायतीची उद्घोषणा केली. एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात असा प्रकार सुरू आहे. दुहेरी धोरणामुळे शासनाचा खर्च मोठ्या प्रमाणात होतं आहे.
गावाचा वाढता विस्तार, लोकसंख्या लक्षात घेता येथे नगरपंचायत होणे अपेक्षित होते. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला.
निवडणूक आयोगाकडे निवेदन
नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होत असल्याने सध्या गावात सुरू असलेली ग्रामपंचायत निवडणूक स्थगित करण्यात यावी, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांकडे मनसेचे तालुकाध्यक्ष मुकुंद रोटे यांनी केली आहे.
चर्चांना उधाण
निवडणूक ग्रामपंचायतीची की नगरपंचायतीची या चर्चांना उधाण आलेले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या ऐन तोंडावर नगरपंचायतीची घोषणा झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया थांबणार नाही, असे अनेकांचे मत-मतांतरे आहे. त्यामुळे सध्या प्रचाराची शांतता असली तरी चर्चांमुळे संभ्रम वाढला आहे.