जळगाव / नशिराबाद : बहुप्रतीक्षीत नशिराबाद नगरपंचायतीची उद्घोषणा नगर विकास विभागाने मंगळवार, २९ डिसेंबर रोजी केली आहे. यामुळे आता नगरपंचायतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या उद्घोषणेसोबतच हरकती मागविण्यात आल्या असून महिनाभरानंतर या विषयी निर्णय होणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर निवडणुकीविषयी निर्णय होणार आहे. जिल्ह्यातील ही पाचवी नगरपंचायत राहणार आहे.
नशिराबाद नगरपंचायची अधिसूचना निघाल्यानंतर ३० दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती सादर करायच्या आहेत. त्यानंतर त्यावर निर्णय होणार असल्याचे नगर विकास विभागाने म्हटले आहे. दरम्यान नशिराबाद ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. यात ही अधिसूचना निघाल्याने निवडणुकीविषयी काय निर्णय होणार, या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या विषयी जो पर्यंत राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश येत नाही, तो पर्यंत सध्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे.
राज्य शासनाकडे पत्र व्यवहार करणार
एकीकडे ग्रामपंचायत निवडणूक प्र क्रिया सुरू असताना ही अधिसूचना निघाल्याने या विषयी राज्य निवडणूक आयोगाकडे जिल्हा प्रशासन पत्र व्यवहार करणार आहे.
पाचवी नगरपंचायत
नशिराबाद ही पाचवी नगरपंचायत ठरणार आहे. यापूर्वी वरणगाव, बोदवड, मुक्ताईनगर, शेंदुर्णी या नगरपंचायत आहेत. नशिराबाद विषयी जवळपास महिनाभरात अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
———————-
नशिराबाद नगरपंचायचीविषयी उद्घोषणा झाली असली तरी राज्य निवडणूक आयोगाचे जो पर्यंत काही निर्देश येत नाही तो पर्यंत ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार आहे.
- नामदेव पाटील, तहसीलदार