नगरपंचायतीची उद्घोषणा झाली आहे, पण सरकारी काम अन् महिनाभर थांब अशी स्थिती आहे. वॉर्ड रचना, विस्तार हद्द, करप्रणाली कशी ठरणार, पुन्हा लोकसंख्या सर्व्हे होणार , या सर्व सरकारी आवश्यक बाबी पूर्ण होण्यासाठी निदान सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागणार. प्रत्यक्षात नगरपंचायत सुरू होण्यासाठी व निवडणुकीसाठी किती महिने जाणार. तो पर्यंत पाणी, रस्ते, पथदीप, बांधकाम परवानगी आदी कामे खोळंबण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत प्रशासक असले तरी त्यांच्याकडे अन्य गावांचा कारभार आहे. त्यात पूर्णतः गावाच्या रचनेची माहिती नाही. जिल्ह्यात मोठे गाव असले तरी वर्षानुवर्षांपासूनचा पाणीप्रश्न सुटला नाही. दर वर्षी जानेवारी ते पाऊस येईपर्यंत पाणीटंचाईशी सामना करावा लागतो. गावात करवसुली कशी होणार, कर्मचारीचे पगार या सर्व प्रश्नांची उत्तर प्रश्नांकित आहे. गाव मोठे, समस्या मोठ्या अशी स्थिती आहे. त्यामुळे दोन वर्षे का होईना ग्रामपंचायत निवडणूक झाली असती तर वॉर्डा वॉर्डात सदस्यांनी कामे मार्गी लावले असते, अशी चर्चा होत आहे.
गाव विकासासाठी एकत्र येतील ना?
ग्रामपंचायत ऐवजी नगरपंचायतीची निवडणूक व्हावी यासाठी मतभेद मनभेद विसरून राजकारण बाजूला सारून गावातील सर्वपक्ष व गावपुढारी एकत्र आले. तसे ग्रामविकासासाठी कायमस्वरूपी एकत्रित येतील ना? असा प्रश्न आणि चर्चा आता रंगू लागले आहे. माघारीच्या नाट्यमय घडामोडी सामूहिक माघारीचा ऐतिहासिक निर्णय याबाबतची खलबते आता होत आहे.
बिनविरोध झालो असतो रे भो.....
८२ पैकी ८१ जणांनी सामूहिक माघारीमध्ये सहभाग घेऊन इतिहास रचला. त्यामुळे ग्रामपंचायतीत एक जागा बिनविरोध झाली असून, १६ जागा रिक्त असल्याने पोटनिवडणूक होईल का तुल्यबळ संख्या नसल्याने होणार नाही ? अशा अनेक शंका व चर्चांना ऊत आलेला आहे. त्यासोबतच अनेक जण मी पण माघारी घेतली नसती तर आज मी पण बिनविरोध झालो असतो अशा चर्चा रंगत आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर विविध वॉर्डात बिनविरोध होण्यासाठी अनेकांनी सुरुवातीला खूप प्रयत्न केले अनेकांची मनधरणी केली मात्र ऐनवेळी सामूहिक माघारीने सर्वांच्या पदरात मात्र निराशा आली.
पोटनिवडणुकीसाठी आता प्रयत्न ?
ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक व्हावी यासाठी आता गावातील काही गट प्रयत्न करीत आहे. त्यासंदर्भात बैठकीचे नियोजन करून शासनाकडे पाठपुरावा करण्याची तयारी दर्शवित आहे. त्यामुळे आता नेमके होते काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय चर्चांना बुडबुडे येऊ लागले आहेत. नेमकं होणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, संभ्रमावस्था पुन्हा नव्याने वाढू लागली आहे. यंदाच्या निवडणुकीत अनेक नवे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात होते. विजयाची माळ आपलीच असे प्रत्येकाच्या मनामनात होते. मात्र गाव हितासाठी सर्वांनीच माघारी दर्शविली.
निकालाची उत्कंठा.....
ग्रामपंचायत निवडणूक रद्द व्हावी, नगरपंचायत उद्घोषणा झाल्यामुळे आता नगरपंचायतीची निवडणूक व्हावी याकरिता औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. निकालाची उत्कंठा आहे. माघारीच्या घडामोडींमुळे होणारा संभ्रम वाढला आहे. त्यामुळे आता पुन्हा निवडणूक कोणती होणार? याविषयीची उत्सुकता असून, न्यायालयाच्या निकालाची सर्वांना प्रतीक्षा आहे.
कोरम नसल्याने बरखास्तीची शक्यता?
१६ जागा रिक्त असून, एक बिनविरोध झाली. मात्र कोरम पूर्ण नसल्याने ही ग्रामपंचायत बरखास्त होण्याची शक्यता वर्तविला जात आहे व चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे संभ्रम पुन्हा नव्याने घर करत आहे. निवडणुकीच्या सारीपाटाचा बेरंग झाला. निवडणुकीचे राजकारण तर झाले नाही ना? अशा आता कोपरखळ्या व चर्चा रंगू लागल्या आहेत.
मनधरणी ते मनस्ताप
सामूहिक माघारीकरिता गावातील अनेक दिग्गजांनी सर्वच उमेदवारांची मनधरणी केली होती. मात्र आपल्याही गावची ग्रामपंचायत निवडणूक झालीच पाहिजे होती. अशा आता चर्चेमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा सूर उमटून येत आहे.