नशिराबाद : येथील ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेचे रूपांतर करण्याची उद्घोषणा झाल्यामुळे नशिराबाद ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द करण्यात यावी व नगरपंचायतीची योग्य ती कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवदेन देण्यात आले.
नशिराबादला ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू असून अनेक इच्छुकांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. अशातच २९ डिसेंबर रोजी शासनाच्या नगर विकास विभागाने नगरपरिषदेचे उद्घोषणा केली. नगर विभागाने राज्य निवडणूक आयोगाला ग्रामपंचायत निवडणूक रद्द करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे सध्या मतदार उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून निवडणूक होणार किंवा नाही याबाबत शंका आहे. शासनाच्या होणाऱ्या खर्चाला आळा बसण्याची ग्रामपंचायत निवडणूक रद्द होणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे निवेदन देताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लीना महाजन, माजी सरपंच पंकज महाजन, विकास पाटील, विनोद रंधे, सय्यद बरकली, देवेंद्र पाटील, अब्दुल रहिम शे.अहमद, कुरेशी शेख फिरोज शे.अब्बास, शेख मेहमूद शे. यासीन, यशवंत करडे, पिंजारी अझरुद्दीन शेख अहमद आदी उपस्थित होते.