नशिराबाद : गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नशिराबादला नगरपंचायत करण्याची मागणी होत होती. अखेर मंगळवारी नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याची उद्घोषणा नगर विकास विभागाने केली आहे. नशिराबादमध्ये फटाके फोडून जल्लोष व आनंद व्यक्त करण्यात आला.
नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली. एकीकडे ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू तर दुसरीकडे नगर पंचायत प्रक्रिया सुरू, अशा द्विधा स्थितीत नशिराबाद कर अडकले होते. त्यातच २३ डिसेंबरपासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भारण्याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. नगरपंचायत होणारच; पण ग्रामपंचायत निवडणूक खर्चही होईल म्हणून निवडणूक आयोगाकडे नगर विकास खात्याने ग्रामपंचायत निवडणूक पुढे लांबवावी म्हणून पत्र देण्यात आले होते. त्यावर विचार सुरू होता. अखेर मंगळवारी सायंकाळी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्याबाबतच्या उद्घोषणेचे पत्रक जाहीर होताच सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला. येथे कार्यकर्ते व नागरिकांनी चौकाचौकात फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
--
नगरपंचायतीच्या निर्णयाचा आनंद आहे. गावाच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्णत्वास आली- लालचंद पाटील जि.प. उपाध्यक्ष
नगरपंचायत झाल्यामुळे आनंद आहे. गावाचा सर्वांगीण विकास होईल. उशिरा का होईना नगरपंचायत घोषणेला न्याय मिळाला. - पंकज महाजन, माजी सरपंच
उशिरा का होईना नशिराबादचे भाग्य उजळले. नगरपंचायतीचा आनंद आहे. गावाच्या विकासात भर पडेल. -
विकास पाटील, माजी सरपंच
नगरपंचायतीच्या निर्णयाचे स्वागत आहे. नगरपंचायतीची उद्घोषणा तर झाली; मात्र ग्रामपंचायत निवडणूक स्थगितीबाबत शासनाने लवकर जाहीर करावे. - मुकुंद रोटे, मनसे तालुकाध्यक्ष
नगरपंचायत करण्याबाबतचा पालकमंत्र्यांनी शब्द पाळला आहे. नगरपंचायतीचा आनंद आहे.
चेतन बराटे, युवा सेना शहरप्रमुख
नगरपंचायतीच्या निर्णयाचे स्वागत आहे. गावाचा सर्वांगीण विकास होईल. अखेर नगरपंचायतीचे भाग्य उजळले याचा आनंद आहे.
योगेश पाटील नशिराबाद शिक्षण मंडळ कार्याध्यक्ष