जलसंकट येणार :१४ ठिकाणची वीज कापणार
दरम्यान नशिराबाद गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांच्या ठिकाणची तब्बल सव्वा कोटी रुपये वीजबिलाची थकबाकी असल्यामुळे शुक्रवारपासून वीज वितरण कंपनी नशिराबाद गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या बेळी, मुर्दापूर, वाघुर व स्थानिक जलस्त्रोत अशा तब्बल चौदा ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही करणार असल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता पवन वाघुळदे यांनी ‘लोकमत’ला दिली.
आता गावात अंधारासह जलसंकटाचा सामना नशिराबादकरांना करावा लागणार आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रताही वाढत असल्यामुळे पाणी टंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. मात्र आता तर जलस्त्रोतांच्या ठिकाणचा विज पुरवठा खंडित होणार असल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा मात्र तीव्र बसतील.
ईन्फो
सगळीच बोंबाबोंब
आधीच ग्रामपंचायत निवडणूक न झाल्यामुळे या ठिकाणी प्रशासकीय कारभार सुरू आहे नियोजनशून्य कारभार सुरू असल्याची ओरड आता ग्रामस्थ करत आहेत. त्यातच थकित वीज बिलामुळे आरओ प्रणालीसह पथदीव्यांची वीज कापण्यात आली आहे. आता जलस्रोतांच्या ठिकाणची पाणी पुरवठ्याची वीज कापण्यात आल्यास गावकऱ्यांना जल संकट उभे राहणार आहे. लोकप्रतिनिधींनी यावर तात्काळ तोडगा काढावा. मतांचा जोगवा मागणारे गप्प का?असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
तोडगा काढा
नशिराबाद ग्रामपंचायतीचे ही वीज वितरण कंपनीकडे मालमत्ता कराचे लाखो रुपये थकीत आहेत. याबाबतचे काही प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगण्यात येते. मग आता जर वीज वितरण कंपनी वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही करत आहे मग ग्रामपंचायत गप्प का? दोघांकडे थकबाकी आहे तर यावर तोडगा काढून ग्रामस्थांना पाणी व पथदिव्यांचा प्रकाश द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.