लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांसाठी अत्यंत महत्त्वाची वाहन सेवा १४ डिसेंबरपासून खंडित असून, ही सेवा सुरू करण्यासाठी संबंधित संस्थेला आदेश द्यावे, अशी मागणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी आरोग्य सेवा आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. याआधी त्यांनी संस्थेला पत्र दिले होते. ही सेवा बंद असल्याने ही आरोग्य सेवा अडचणीत आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या कार्यक्रमांतर्गत ४६ पथके कार्यरत असून, ४५ पथकांना वाहने पुरविण्यात आली होती. मात्र, १४ डिसेंबरपासून ही वाहने उपलब्ध नसल्याने वाहन, चालक, मालक यांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी संपर्क केला, तेव्हा वाहने बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर डॉ. चव्हाण यांनी संबंधित संस्था श्री. छत्रपती शिवाजी महाराज, स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था यांना पत्र देऊन याबाबत कल्पना दिली होती. अंगणवाडी, शाळा सुरू झाल्या असून, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे असल्याने या ठिकाणी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी, आणण्यासाठी तसेच कोरोनाकाळात वाहन सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र ही सेवाच अडचणीत आल्याचे डॉ. चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालकांना २९ डिसेंबर रोजी पत्र दिले देण्यात आले आहे.