चाळीसगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ हा चाळीसगाव ते धुळे दरम्यानचा रस्ता अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला असून या महामार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस जीवघेणी ठरत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे व काटेरी झुडूपांमुळे गेल्या दोन महिन्यात शेकडो अपघात होवून १५ ते २० जणांचा बळी गेला आहे. महामार्गावरील खड्डे यास बहुतांश कारणीभूत असल्याचे अपघातांच्या मालिकेवरून दिसते.चाळीसगाव-धुळे या रस्त्याची चाळण झाली असून तातडीने डांबरीकरण करण्यात यावे यासाठी प्रशासनाकडे अनेक सामाजिक संघटना व प्रवाशांनी निवेदने दिली आहेत. परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. या विभागाकडून काही ठिकाणी दगड टाकून खड्डे बुजवून बोळवण करण्यात येत आहे. दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा हा प्रमुख महामार्ग असूनदेखील या रस्त्याच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. या मार्गावर काटेरी झुडपे व वळणे अधिक असल्याने दोन्ही बाजूंनी रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपांनी रस्ता झाकला जात आहे. त्यामुळे वाहनधारकांना समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यात ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे चुकविण्याच्या नादात वाहन चालकाचे नियंत्रण सुटते आणि अपघात होतात. तसेच काटेरी झुडपांमुळेही अपघात होतात.या रस्त्याची दुरावस्था कधी संपणार, असा सवाल वाहनधारकांतून उपस्थित होत आहे.सात रोजी एक ठारसात जानेवारीला झालेला मेहुणबारे येथील अपघातही याच महामार्गावरील आहे. २८ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता करगाव येथे कवायत घेण्यासाठी जाणा-या मेहुणबारे येथील केंद्रप्रमुख लखीचंद एकनाथ कुमावत यांना धुळे बायपासजवळ जीव गमवावा लागला होता. याआधीही असे अनेक अपघात झाल्याने या रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे.
राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 10:02 PM