ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि.14- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चा जळगाव शहरातून जाणाऱ्या 15.4 कि.मी लांबीच्या मार्गाचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चौपदरीकरणासह समांतर रस्त्या (सर्व्हिस रोड) सह विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत आज जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे झालेल्या बैठकीत प्रकल्प अहवालाचे सादरीकरण करण्यात आले. आवश्यक सुचनांच्या समावेशानंतर या प्रकल्प अहवालाचा प्रस्ताव मार्गी लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी अग्रवाल यांच्या दालनात हे सादरीकरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे धुळे येथील प्रकल्प संचालक अरविंद काळे, प्रकल्प व्यवस्थापक अरविंद गंडी, प्रकल्प सल्लागार अजय पोफाळकर तसेच निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांची उपस्थिती होती.
यावेळी झालेल्या सादरीकरणात माहिती देण्यात आली की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 च्या चौपदरीकरणाचे काम अमरावती ते गुजरात सिमेपर्यंत होत आहे. या कामाचे दोन टप्पे करण्यात आले असून चिखली ते तरसोद व तरसोद ते फागणे हे ते दोन टप्पे आहेत. तरसोद ते फागणे या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील महामार्गाचा समावेश आहे. त्यात जळगाव शहरातून जाणारा अस्तित्वातील महामार्गाचे चौपदरीकरण व त्या लगत असणाऱ्या सर्व्हिस रोडच्या कामांचा समावेश आहे. हे काम स्वतंत्ररित्या होत आहे. मुळ कामात जळगाव शहराबाहेरुन वळण रस्ता जाणार आहेच. त्याव्यतिरिक्त जळगाव शहरातील रस्त्याचेही काम आता होत आहे.
या कामात 15.4 किमी रस्त्याचे (तरसोद ते पाळधी फाटा) चौपदरीकरण व काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याची रुंदी 60 मिटर असेल. 60 मिटर रुंदीची जागा 10 किमी लांबीसाठी उपलब्ध आहे. त्यानुसार या रस्त्यासाठी गिरणा नदीवर दोन समांतर नवे पूल. रेल्वे ओव्हरब्रीजच्या बांधकामाचा समावेश आहे. तसेच दोन्ही बाजूचे सर्विस रोड, 10 ठिकाणी व्हेईकल अंडरपास मार्ग (वाहनांचा भुयारी मार्ग) तसेच 20 ठिकाणी पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्गिका असेल. शिवाय दोन ठिकाणी (आकाशवाणी चौक व आयटीआय जवळ) लोअर्ड हायवे करण्यात येईल. तर कालिकादेवी चौकात फ्लाय ओव्हर प्रस्तावित करण्यात आला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना 7 मिटरचा सर्व्हिस रोड असेल, त्यासोबतच 2 मिटरचा फुटपाथही असेल. शिवाय जेथे 60 मिटर रुंद जागा उपलब्ध असेल अशा ठिकाणी (सुमारे 10 किमी लांबीचा) सायकल ट्रॅकही केला जाणार आहेत. या शिवाय रस्त्याच्या सुशोभिकरणासाठी लॅण्डस्केपिंग, वृक्ष लागवड, रस्त्याच्या मधोमध एलईडी पथदिवे, चौकांमध्ये हायमास्ट दिवे लावण्यात येणार आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी रस्त्यांच्या दिव्यांसाठी सौर उर्जेचा वापर करणे, रस्त्याच्या कडेला ठराविक अंतरावर स्वच्छता गृहे, पोलीस व आपत्ती मदत केंद्र तयार करावेत अशा सुचना केल्या. या कामाची प्राथमिक किंमत 450 कोटी रुपयांची असून त्यात आवश्यक सुचनांचा समावेश करुन या प्रस्तावाला अंतिम स्वरुप दिले जाईल, असे जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी सांगितले. त्यासाठी जिल्हाप्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान येत्या 27 तारखेपासून महामार्गालगत अतिक्रमण हटविण्याच्या कामांना सुरुवात होणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.