विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची ८० जागांची मागणी !
By अमित महाबळ | Published: June 9, 2024 09:56 PM2024-06-09T21:56:16+5:302024-06-09T21:58:51+5:30
किमान ८० जागा राष्ट्रवादीने लढविल्या पाहिजेत - अनिल पाटील
जळगाव : राष्ट्रवादी अजित पवार गट विधानसभेच्या ८० जागा लढविण्यासाठी इच्छूक आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चार जागांचा समावेश आहे. महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून यावर कमी-अधिक काय असेल तो निर्णय होईल, असे पक्षाचे नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यांच्या हस्ते रविवारी, पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन शिव कॉलनीजवळ करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांत काय भूमिका राहील या प्रश्नावर बोलताना अनिल पाटील म्हणाले, की महायुतीमध्ये असताना किंवा नसताना हा विचार करण्याची आवश्यकता नाही. जे निकष ठरले आहेत, त्यानुसार छगन भुजबळांनी ९० जागांची मागणी मागच्या मेळाव्यात केली असली, तरी किमान ८० जागा राष्ट्रवादीने लढविल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. शक्य त्या ठिकाणी सर्वेक्षण, निवडून येण्याची क्षमता तपासून उमेदवारी किंवा जागेची घोषणा केली पाहिजे आणि त्यासाठी आतापासूनच कामाला लागले पाहिजे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील ४ जागा, नंदुरबार २, धुळे २ याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात आठ जागांची अपेक्षा आहे, असे अनिल पाटील यांनी सांगितले.
भाजपाच्या विजयात आमचा सिंहाचा वाटा...
लोकसभा निवडणुकीत पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता महायुती उमेदवाराच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तालुकाध्यक्ष व सहकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले म्हणून उत्तर महाराष्ट्रात आठपैकी दोन जागा महायुतीच्या निवडून आल्या आहेत. या विजयात भाजप, शिवसेना यांच्या बरोबरीने राष्ट्रवादी अजित पवार गटाचाही सिंहाचा वाटा आहे.
कॅबिनेट मंत्रीपदाबाबत विचार होईल
देशात एनडीएचे जे सूत्र ठरले आहे, त्यामध्ये एकाच पक्षाला वेगळा न्याय देणे त्यांना कदाचित उचित वाटले नसेल. यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रात मंत्री म्हणून चांगले काम सांभाळले. त्यांनी उपमंत्री किंवा राज्यमंत्री म्हणून काम करणे योग्य नाही. पटेल व सुनील तटकरे दोन्ही नेते सक्षम आहेत. म्हणून कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी करण्यात आली होती. येणाऱ्या काळात प्राधान्याने विचार होईल, अशी अपेक्षा अनिल पाटील यांनी व्यक्त केली.