सुशील देवकर
जळगाव-लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नैराश्य व मरगळ आलेल्या राष्टÑवादी काँग्रेसने जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक होण्याची गरज आहे. मात्र जिल्ह्यात आजही राष्टÑवादीत सुस्ती असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती मात्र २४ जुलै रोजी होत आहेत. जनतेच्या प्रश्नांवर काम न करताच मत मागण्यास गेल्यास निवडणुका राष्टÑवादीसाठी केवळ एक उत्सव ठरण्याची भिती व्यक्त होत आहे.मागील विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादीचे जिल्ह्यातील संख्याबळ ५ वरून १ वर आले. मात्र तरीही पक्षातील गटबाजी संपलेली नाही. पक्षाच्या जिवावर मोठे झालेल्या नेते, कार्यकर्त्यांना स्वत:च्या अस्तित्वासाठी तरी पक्ष टिकवून ठेवण्याची धडपड करावी, असे वाटताना दिसत नाही. त्याचाच फटका लोकसभा निवडणुकीत बसला. डॉ.सतीश पाटील यांच्या राजीनाम्यानंतर अॅड.रविंद्र पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. मितभाषी असलेल्या अॅड.पाटील यांच्याकडून सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यासोबतच आक्रमकपणाची जोड देण्याची नितांत आवश्यकता आहे.लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्विकारत राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पाटील यांनी पक्षाकडे पदाचा राजीनामा पाठविला होता. मात्र त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. निवडणुकांना जेमतेम दीड-दोन महिन्यांचा कालावधी उरला असल्याने पक्षाला बदल करायचाच असेल तर तो तातडीने करणे आवश्यक आहे. मात्र युवक, ज्येष्ठ अशा सगळ्यांनाच सोबत घेण्याची व जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडण्याची गरज आहे. मात्र शहरातील जनतेच्या समस्यांवर देखील एकही पदाधिकारी आवाज उठविताना दिसत नसल्याचे चित्र आहे. ते बदलण्याची गरज आहे.जनतेचे प्रश्न आक्रमकपणे आंदोलन करून मांडले, सोडविले तरच मतदार पक्षाकडे वळेल. युवा मतदारही पक्षासोबत येईल. मात्र अपवाद वगळता राष्टÑवादीकडून जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन झाल्याचे दिसून आलेले नाही. याउलट शहरात नावालाच अस्तित्व उरलेल्या काँग्रेसकडून खराब रस्ते, खड्डे व जनतेच्या प्रश्नांवर मनपासमोर धरणे, आंदोलन केले जात आहे. राष्टÑवादीच्या काही महिला पदाधिकाऱ्यांनीही काँग्रेसच्या आंदोलनात सहभाग घेत जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविल्याचे दिसून आले. असे असताना राष्टÑवादी मात्र आंदोलन करण्यास किंवा जनतेचे प्रश्न मांडण्यास का कचरतेय? असा प्रश्न आता राष्टÑवादीच्याच पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पडायला लागलाय. अगदी सोशल मिडियावर देखील व आपसातही हे कार्यकर्ते याबाबत चर्चा करून खंत व्यक्त करताना दिसतात. पक्षाला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर राष्टÑवादीच्या नेतृत्वाने याची वेळीच दखल घेण्याची गरज आहे.