नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनेकांनी वृक्षारोपण करताना वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला. मात्र किती जण त्याचे संवर्धन करतात, हा एक प्रश्न असतो. मात्र याच वृक्षांमुळे मिळणाऱ्या नैसर्गिक आनंदाची अनुभुती आवर्जून सांगावासी वाटते. आणि त्यातून पर्यावरण रक्षणासाठी काहीसा हातभारही लागू शकेल. आमच्या घराच्या चारही बाजूने मी आणि माझे सासरे जयंत सराफ व सासुबाईंनी अनेक झाडे लावली. ही सर्व मोकळी वाढलेली झाडे खूप नेत्रसुखद आनंद, अल्हाददायक हिरवाई, छान मोकळी हवा, गारवा, सुगंध, पक्ष्यांचा चिवचिवाट, त्यांचे छायाचित्र काढण्यासाठी माझ्या मुलांच्या युक्त्या क्लुप्त्या, आंब्याच्या दिवसात येणारा मोहराचा आणि कैऱ्यांचा सुगंध, त्याचे ताजे लोणच, गुळांबा.. बुचाच्या फुलांचा सडा, दुपारी शाळा सुटल्यावर बदाम वेचण्यासाठी गुपचूप आंगणात शिरणारी पाठीवरच्या दप्तराची ओझी सुध्दा विसरलेली मुले, क्वचित कधी मेहरुणवरुन येणारी माकडांची फौज किंवा एखादं दुसरे चुकलेले माकड, हे सर्वच निसर्ग आणि त्याच्या निसर्गदत्त सवयींशी निगडीत आहे. हे सर्व अनुभवता येते ते केवळ झाडांमुळे. मात्र या झाडांवरून शुभ-अशुभ असे सल्ला देणारेही अनेक जण येतात व ही झाडे तोडण्याचा (अनाहूत) सल्ला देतात. मात्र तीच मंडळी व इतरही अनेक जण याच झाडांवरून कढीपत्ता, फुले व फळेही तोडून नेतात. मग या झाडांचा त्रास कसा? आंब्याला रसायनाचे इन्जेक्शन देतानाचे फोटो पाहिले की अनाहूत सल्ला द्यावासा वाटतो, ‘दारात वृक्ष लावा आणि रसायनमुक्त फळे खा.- डॉ. शमा सुबोध, प्राध्यापिका, आयएमआर महाविद्यालय, केसीई
वृक्षसंवर्धनातून नैसर्गिक आनंदाची अनुभुती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:55 PM