लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यात होणाऱ्या ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवार, २८ डिसेंबर रोजी १५८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. आतापर्यंत एकूण १६० उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, पहिले दोन दिवस फारसा प्रतिसाद नसताना सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती. यामुळे तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरुप आले होते. अखेर गर्दी होऊ लागल्याने पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला.
जळगाव तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींसाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. दुसऱ्या दिवशीही केवळ दोनच अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर तीन दिवस सुटी होती. त्यामुळे सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच झुंबड उडाली. तालुका प्रशासनाने कार्यालयाच्या २०० मीटर परिसरात बॅरिकेट्स लावले असून, ग्रामपंचायतनिहाय अर्ज स्वीकारण्यासाठी टेबलाची मांडणी करण्यात आली आहे. त्या-त्या टेबलवर त्या-त्या ग्रामपंचायतीचे उमेदवार उमेदवारी अर्ज देत होते. निवडणूक निर्णय अधिकारी हे ज्या प्रभागात, ज्या जागेवर उमेदवारी करावयाची आहे, त्या जागेचे आरक्षण, उमेदवारांचा मतदार यादीतील अनुक्रमांक, जात प्रमाणपत्र, उमेदवाराला निवडणुकीत कोणते चिन्ह घ्यायचे आहे, ती तीन-चार चिन्ह प्राधान्य क्रमांकाने उमेदवारी अर्जावर लिहून घेत आहेत. या सर्व बाबी तपासून अर्ज स्वीकारून उमेदवारांना पोहोच देण्यात आली.
४३पैकी १९ ठिकाणी एकही अर्ज नाही
तालुक्यात सोमवारी १६० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये असोदा ग्रामपंचायतसाठी सर्वाधिक २३ अर्ज दाखल झाले आहेत. तर एकूण ४३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींमधून एकही अर्ज दाखल झालेला नाही. शून्य अर्ज संख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये तुरखेडा, नांद्रा खु.-खापरखेडा, कुसुंबा खु., उमाळे-देव्हारी, आव्हाणे, फुपनगरी, भोकर, बोरनार, लमांजन-वाकडी-कुऱ्हाडदे, नांद्रा बु., मोहाडी, गाढोदे, वडली, जवखेडा, वावडदा, कडगाव, तरसोद, रिधूर, डिकसाई यांचा समावेश आहे.
ग्रामपंचायतनिहाय दाखल अर्ज
सोमवारी दाखल एकूण
असोदा २४ २४
धानवड १७ १७
कानळदा १४ १४
भादली बु. १२ १२
कठोरा ११ ११
शिरसोली प्र.न. १० १०
शिरसोली प्र.बो. १० १०
फुपनी १० १०
म्हसावद ०१ ०१
ममुराबाद १० ११
आवार ०२ ०३
कानळदा १४ १४
वडनगरी ०१ ०१
नशिराबाद ०४ ०४
कंडारी ०३ ०३
पिलखेडा ०१ ०१
सावखेडा बु. ०२ ०२
दापोरे ०५ ०५
धानोरा बु. ०६ ०६
चिंचोली ०४ ०४
रायपूर ०१ ०१
जळगाव खु.-तिघ्रे खिर्डी ०१ ०१
रामदेववाडी ०१ ०१
शेळगाव-कानसवाडे ०२ ०२
तरसोद ०४ ०४
एकूण १५८ १६०