कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्वच ठिकाणच्या शाळा बंद आहेत. शाळा आणि विद्यार्थ्यांची विस्कटलेली घडी आद्यप बसलेली नाही. अशात दरवर्षी जुलै महिन्यात जळगाव येथे १८ महाराष्ट्र बटालियन ग्रुप हेडकॉटरच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळेत शिक्षण घेणाऱ्या एनसीसी प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना एनरोलमेंट नंबर देण्यात येतो. मागील वर्षी कोरोनाची पहिली लाट बरीच ओसरली असताना आठवीच्या विद्यार्थ्यांना एनरोलमेंट नंबर मिळून प्रवेश मिळाला होता. यंदा मात्र ही प्रवेश प्रक्रिया लांबली आहे.
ज्युनिअर आणि सिनिअर एनसीसी
तालुक्यात फक्त जेई स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे एनसीसीचे जूनिअर आणि सिनिअर विभाग उपलब्ध आहे. ज्युनिअरसाठी १०० जागा आहेत तर सिनिअरसाठी ५० जागा आहेत. दरवर्षी शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या ४५ ते ५० विद्यार्थ्यांना ज्युनियर विभागामध्ये प्रवेश मिळतो तर सिनिअरसाठी पूर्ण ५० विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या पात्र मिळतात.
आर्मीचा चमू आलाच नाही
इयत्ता आठवीतील इच्छुक विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये प्रवेश देण्यासाठी त्यांची चाचणी घेण्याकरिता दरवर्षी तीन ते पाच जणांचा समावेश असलेले आर्मीचा चमू शाळांमध्ये येत असतो. या निवड चमूत १८ महाराष्ट्र बटालियनचे कर्नल, सुभेदार आणि कमांडिंग ऑफिसर यांचा समावेश असतो. वर्दीधारक, कर्नल, मेजर आणि त्यांचे सहकारी विद्यार्थ्यांसाठी आकर्षण ठरतात. यंदाच्या वर्षी मात्र अद्यापपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नसल्याने हा चमू आलेला नाही.
तीन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परेडचा मान
गेल्या ७ वर्षाच्या कालखंडात जेई स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांना दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय परेडमध्ये सहभागी होण्याचा मान मिळाला. यात २०१३ मध्ये इम्रान हुसेन पिंजारी, २०१६ मध्ये यशवंत अशोक दांडगे, २०१९ मध्ये सिद्धांत अजाबराव पाटील हे दिल्लीत राष्ट्रीय परेडमध्ये सहभागी झाले होते. तर अरुण राजू जाधव हा २०१९ मध्ये स्थल सेना कॅम्पमध्ये सहभागी झाला होता.
विद्यार्थ्यांचे आयकॉन सैनिक
अलीकडे या शाळेचा विद्यार्थी दीक्षित सुभाष शिरसोदे याची वायू सेनेत, राजधर गंगाधर बोदडे याची मर्चंट नेव्ही तर इम्रान पिंजारी आणि कृष्णा शिंगोटे यांची सैन्य दलात निवड झाली आहे. एनसीसीच्या माध्यमातून पुढे गेलेले हे विद्यार्थी राष्ट्रप्रेमाने प्रेरित शालेय विद्यार्थ्यांसाठी आयकॉन बनले आहेत.
एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थी दशेतच मुलांना शिस्त, संयम आदींसह देश प्रेमाचे बाळकडू पाजले जाते. या विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच देशासाठी मातृभूमीसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा आणि जिद्द मिळते. आज आमच्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी तालुक्याला सैन्य दलात भरती होण्याचा सन्मान मिळून दिला.
- विजय लोंढे,
लेफ्टनंट तथा शिक्षक.