जळगाव : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. जळगावात राज्यपालांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला होता. सोमवारी जळगाव दौर्यावर असलेल्या राज्यपालांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवण्याचा तयारीत होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाची पूर्वकल्पना झाल्याने पोलिसांनी आंदोलन करण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे कालपासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांच्या उपस्थितीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जलतरण तलावाचे उदघाटन होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभर संतप्त पडसाद उमटत आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आज जळगावात त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणार होते. शहरातील आकाशवाणी चौकात हे आंदोलन होणार होते. मात्र, पोलिसांना या आंदोलनाची माहिती मिळाली. त्यामुळे आंदोलन करण्यापूर्वी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांची रामानंदनगर पोलीस ठाण्यात रवानगी केली.
कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजीपोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. राज्यपालांच्या ताफ्याला काही अडचण होऊ नये, म्हणून आकाशवाणी चौकात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.