जळगाव,दि.19- राष्ट्रवादी काँग्रेसमधील व्यक्तींनीच राष्ट्रवादी काँग्रेसला मागील काळात पराभव केला.. पण संघटना राहील तर आपण राहू, असा विचार सर्वानी करायला हवा. मी येते.. दादा (अजित पवार) येतो तेवढी लोकं भेटायला येतात.. गर्दी होते. पण नंतर कुणी भेटत नाही.. येत नाही..मतभेद विसरा व कामाला लागा, अशा कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील कार्यालयात जि.प., पं.स.सदस्यांच्या सत्कारप्रसंगी नेते व पदाधिकारी यांना दिल्या.
70 हजार कोटींची कामेच झाली नाहीत तर अपहार झाला कसा?
सिंचन प्रकल्पांमध्ये 70 हजार कोटींचा अपहाराचा आरोप करून अजित पवार व सुनील तटकरे यांना बदनाम केले. पण आघाडीची सत्ता असताना सात वर्षात 70 हजार कोटींची कामेच सिंचन क्षेत्रात झाली नाहीत. मग एवढा अपहार होईल कसा, असा प्रश्नही सुळे यांनी केला.
लोकसभेच्या वेळी उमेदवाराची शोधाशोध करावी लागते
लोकसभा निवडणूक लढण्यास इकडे कुणी फारसे इच्छुक नसते. आता दीड वर्षानंतर निवडणूक येईल. त्यामुळे आातापासून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची शोधाशोध करा, अशी सूचना सुळे यांनी केली.
सक्षम विरोधक बना
मागील अनेक वर्षे सत्तेत राहील्याने विरोधकाच्या भूमिकेत अनेक जण आलेच नाहीत. पण मरगळ झटका. विरोधकाची भूमिका पार पाडा. सोशल मीडियावर प्रत्येक पदाधिका:याचे अकाउंट उघडा. भाषणं ऐकायला लोकांना वेळ नाही. लोकांमध्ये जा.. त्यांच्यात उठा. बसा. संघर्षयात्रेमुळे कुठेतरी कार्यकर्ते हलत आहेत. मनापासून काम करा, असेही सुळे यांनी सांगितले.