लिहायचं होतं 'देहू' झालं 'जुहू', अवघ्या १० कार्यकर्त्यांमधलंही राष्ट्रवादीचं आंदोलन फसलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 04:41 PM2022-06-16T16:41:40+5:302022-06-16T16:42:14+5:30
महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा आरोप करणाऱ्या कार्यकर्त्यांची जुहू आणि देहू यात मात्र गफलत झाल्याचं पाहायला मिळालं.
प्रशांत भदाणे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी लोहगाव विमानतळावर गेलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर मोदींनी हात ठेवला. त्यानंतर दोघेही देहू येथील कार्यक्रमासाठी गेले. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले; मात्र प्रोटोकॉलनुसार पालकमंत्र्यांना संधी अपेक्षित असताना त्यांना वंचित ठेवले. त्यांचे नाव दिल्लीतूनच कट झाल्याची चर्चा होती. त्यामुळे, राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते नाराज झाले असून हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची भावना राष्ट्रवादीने व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त करत आंदोलनही करण्यात येत आहे. अशातच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जळगावातील आंदोलन चर्चेचा विषय ठरत आहे.
अजित पवारांचं देहू येथील कार्यक्रमात भाषण झालं नाही. याचा निषेध नोंदवण्यासाठी जळगावात राष्ट्रवादीच्या महानगर महिला आघाडीनं आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांच्या हातातील बॅनरवर देहू ऐवजी जुहू (मुंबई) असा उल्लेख करण्यात आला. असं असलं तरी हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही. उत्साही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली तेव्हा ही चूक बंदोबस्तावर असलेल्या एका पोलिसाच्या लक्षात आली.
यानंतरच कुठे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भानावर आले. त्यांनी बॅनर गुंडाळून ठेवला आणि नुसती घोषणाबाजी करून आंदोलनाचा सोपस्कार पार पाडला. देहूतल्या कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण झालं नाही म्हणून महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा आरोप करणाऱ्या कार्यकर्त्यांना, देहू आणि जुहूतला फरक कळू नये, यापेक्षा मोठी शोकांतिका काय असावी, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागलाय.
अवघे दहाच कार्यकर्ते
अवघ्या दहा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झालं. त्यातही आठ महिला आणि दोन पुरुष कार्यकर्ते होते. चुकीच्या बॅनरमुळे नाचक्की झाल्याने त्यांनी आंदोलन अवघ्या काही मिनिटांतच उरकलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनात बॅनरवर चूक होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही एका आंदोलनात बॅनरवर चूक झाली होती.