जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली असून ते उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. आपण मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार घेणार आहोत, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. यावेळी, माझ्या संपर्कात आलेल्या मंडळींनी कोरोना चाचणी करून घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत कुणीही माझ्या भेटीसाठी येऊ नये, असे आवाहनही एकनाथ खडसे यांनी केले आहे.
यासंदर्भात, खडसे यांनी ट्विट करून सांगितले, की "माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. गत ६ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती. पुढील उपचारासाठी मी मुंबईला रवाना होत आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा माझ्या सोबत असल्याने मी लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत असेल."
गेल्या काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि त्यांच्या मुलीलाही करोनाची लागण झाली आहे. रोहिणी खडसे यांनी स्वतःच यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली होती. त्यांची प्रकृती बरी असून त्या खबरदारी म्हणून रुग्णालयातच आहेत. काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी भाजपला जय श्रीराम करत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ आपल्या हातात बांधले आहे.
आपल्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत खान्देशमधील विकासाचे अनेक ड्रीम प्रोजेक्टचे आपण बिजारोपण केले होते. भाजपने चार वर्षे कुठलीही संधी न दिल्याने नाईलाजास्तव आपले स्वप्नातील विकास प्रकल्प साकारण्यासाठी पक्षनेते शरद पवार यांच्याशी त्यासंदर्भात चर्चा करुनच आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
खडसे गेली 40 वर्षं भाजपचे नेते होते -खडसे गेली 40 वर्षं भाजपचे नेते होते. भाजपा वाढविण्यात त्यांचेही मोठे योगदान आहे. ते भाजपत असताना भाजपनेही त्यांना अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. मात्री नाराजीमुळे त्यांनी भाजपला राम-राम ठोकला आणि 23 ऑक्टोबरला त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी संपूर्ण उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याची घोषणाही खडसे यांनी केली आहे.