लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची आढावा बैठक महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, एजाज मलिक तसेच प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी झाली. यावेळी महानगरची कार्यकारिणी बरखास्त करण्यात येऊन निष्क्रिय पदाधिकार्यांना डच्चू देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या बैठकीत राष्ट्रवादी युवक व युवती कॉंग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, अल्पसंख्याक विभाग, सामाजिक न्याय विभाग तसेच इतर सेलचा आढावा घेण्यात आला. कार्यकािरणीत असताना पक्षाचे काम करीत नसलेल्या निष्क्रिय कार्यकर्त्यांना एक संधी देऊन त्यात सुधारणा न झाल्यास पदमुक्त करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
जळगाव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेली जळगाव महानगरची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून नवीन कार्यकारिणीची घोषणा येत्या काही दिवसात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या आढावा बैठकीत पक्षसंघटना वाढीसाठीचे मुद्दे मांडण्यात आले व चर्चा करण्यात आली.
आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी प्रत्येक पदाधिकारी यांनी प्रभागात कार्यक्रम राबविणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.
या आढावा बैठकीत महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, एजाज मलिक, प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक अध्यक्ष स्वप्नील नेमाडे, विद्यार्थी अध्यक्ष अक्षय वंजारी, उत्तर महाराष्ट्र महिला विभागीय उपाध्यक्षा कल्पना पाटील, पदवीधरचे अध्यक्ष प्रा. अनिल पाटील, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जितेंद्र चांगरे, कार्याध्यक्ष तुषार इंगळे, अल्पसंख्याक महानगराध्यक्ष रिजवान खाटिक, अल्पसंख्याक ग्रामीण अध्यक्ष मजहर पठाण, ओबीसी सेलचे अध्यक्ष कौसर काकर, युवती अध्यक्ष आरोही नेवे, महानगर वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र देशमुख उपस्थित होते.