राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तीन पक्ष एकत्रित सत्तेत आहेत; मात्र स्थानिक पातळ्यांवर व्यक्तीपरत्वे राजकारण बदलत असते. त्यामुळे स्थानिक राजकारण हे राज्य आणि केंद्राच्या राजकारणापेक्षा वेगळे असते. असे असल्याने स्थानिक पातळ्यांवर स्वतंत्र आपला पक्ष वाढावा, संघटना मजबूत व्हावी, असे स्वातंत्र्य प्रत्येक पक्षाला आहे...राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विविध विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या आढावा बैठकांमुळे हा मुद्दा चर्चेत येत आहे. ‘नेते भरपूर, कार्यकर्ते नाही’, अशी एक ओळख निर्माण झाल्यानंतर पक्षाला संघटनावाढीसाठी झटावे लागते, काँग्रेस हे जिल्ह्यात त्याचे उदाहरण आहे. राष्ट्रवादीचीही त्याच मार्गावर वाटचाल सुरू आहे का? असा प्रश्न सहाजिकच पडतो. फैजपूर येथेही राष्ट्रवादी आढावा बैठक घेणार आहे. हा दौरा पक्षाचा परिवार संवाद या कार्यक्रमांतर्गत आहे. त्यामुळे महाविकासच्या अन्य दोन पक्षांचा यात समावेश नाही. आघाडी होते नव्हते, शिवाय ऐन निवडणुकांच्या तोंडावर जागा वाटपांचा वाद अन् स्वतंत्र लढण्याची कोणताही पक्ष केव्हाही भूमिका घेऊ शकतो, अशा स्थितीत आगामी काळात प्रत्येक मतदारसंघात पक्ष स्वतंत्ररीत्या मजबूत असावा, असे सर्वच पक्षांना वाटते आणि याचे त्यांना स्वातंत्र्य आहे. मित्रपक्षाचा मतदासंघ आहे म्हणून त्या ठिकाणी पक्ष वाढवू नये, असा विचार करणे आता परवडणारे नाही, त्यामुळे राष्ट्रवादीही सर्वत्र व काँग्रेस, शिवसेनाही सर्वत्र आपला पक्ष वाढविण्यावर भर देत आहे. त्याचाच भाग ही परिवार संवाद यात्रा असल्याचे त्याकडे बघितले जात आहे.
नवीन समीकरणे अपेक्षित
राजकारणात मोठ्या नेत्यांच्या पक्षांतरानंतर नवीन समीकरणे अपेक्षितच असतात किंबहुना तशी समीकरणे समोर आली नाहीत तर आश्चर्य व्यक्त होते आणि चर्चा सुरू होतात. माजी मंत्री एकनाथ खडसे आणि माजी आमदार मनिष जैन यांची भेट, पक्षाच्या कार्यक्रमात एकत्र येऊन एकमेकांबद्दल आदराने बोलणे, केक भरविणे हे नवीन समीकरणही अपेक्षितच होते... प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यापूर्वी संघटना मजबुतीचा प्राथमिक संदेश मात्र या कार्यक्रमांमधून पोहोचविण्यात पदाधिकारी यशस्वी झाले आहेत.