भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे गावातील कर वसुलीचे काम करीत असताना ग्रामसेवकास धक्काबुक्की करुन जातीवाचक शिवीगाळ करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांच्यासह त्यांचे बंधू प्रमोद पाटील आणि अमोल मांडे यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ग्रामविकास अधिकारी गौतम वाडे यांनी गावात घरपट्टी आणि पाणीपट्टीची थकीत कर वसूलीसाठी मोहिम सुरु केली आहे. १ मार्चला ग्रामपंचायतीचे कर्मचारी मयूर चौधरी, राहुल चौधरी, निलेश सपकाळे, कैलास सपकाळे, अनिल चौधरी, रमजान पटेलआदींसह घरोघरी जाऊन करवसुली करीत होते. या दरम्यान पवार गल्लीतील संजय मांडे यांच्याकडे ४१ हजार ३३३ रुपये थकबाकी असल्याने त्यांच्या घरी गेले असता, घरासमोर वयोवृध्द महिला तूर धान्य पाण्याने धूत होती. यावर धान्य धुण्यासाठी पाणी लागते, तर घरातील माणसे आल्यावर त्यांना कर भरण्यास सांगा; असे सांगितले. यावरुन प्रमोद पाटील यांनी हुज्जत घातली. तर जिल्हा परिषदेचे सदस्य रवींद्र पाटील, अमोल मांडे यांनी करवसूलीचा राग मनात ठेवून सरपंच अनिल पाटील, संजय पाटील यांच्यासमक्ष जातीवाचक शिवीगाळ केली. धक्काबुक्की करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे ग्रामसेवक गौतम वाडे यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीच्या जि.प. सदस्यांसह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 10:30 PM