सोमवारी जिल्हा बैठकीचे आयोजन : गटनिहाय नेमले जातील निरीक्षक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून, राष्ट्रवादीने मिशन जिल्हा परिषदेसाठी तयारी सुरू केली आहे. सोमवारी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी कार्यालयात आगामी जि.प. व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तयारीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत सहकार निवडणुकांसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
या बैठकीला ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी, माजी मंत्री एकनाथराव खडसे, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सतीश पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, प्रदेश सरचिटणीस राजीव देशमुख तसेच आमदार अनिल पाटील, माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह जि.प.सदस्य, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे.
गटनिहाय निरीक्षकांच्या नेमणुका
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावरच लढवत आली आहे. आता राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने हाच पॅटर्न स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये राबविण्याचा सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने तयारीबाबतदेखील या बैठकीत आढावा घेण्यात येणार असून, जि.प.च्या गटनिहाय निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. या बैठकीत जिल्हा बँक, दूध संघ व आगामी बाजार समित्यांचा निवडणुकांबाबत देखील चर्चा होणार आहे.