लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : लेंडी नाल्यावरील रेल्वे पुलाखालून जळगाव शहरातील शनी मंदिराकडे जाणारा वर्दळीचा रस्ता वाढत्या अतिक्रमणांमुळे दिवसेंदिवस अरुंद होत चालला आहे. महापालिकेने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने अतिक्रमणधारकांना मोकळे रान मिळाले आहे. शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला चालना मिळालेली असताना या भागात त्याची काहीच हालचाल नसल्याने नाराजीसुद्धा व्यक्त होत आहे.
लेंडी नाल्यावरील रेल्वे पुलाखालून शनी मंदिराकडे जाताना चौघुले प्लॉटसमोर असलेला ममुराबाद जकात नाका वाढत्या अतिक्रमणांमुळे आता दिसेनासा झाला आहे. नाक्याची जुनी खोली जेमतेम तग धरून उभी असली तरी आजूबाजूला वाढलेली पक्क्या घरांची अतिक्रमणे पाहिल्यानंतर नाका अतिक्रमणात आहे की महापालिकेच्या जागेत, अशी शंका उपस्थित होत आहे. नाका महापालिकेच्या जागेत असेल तर त्याच्या परिसरात असलेली सर्व घरे नियमित कशी काय झाली? आणि अतिक्रमित घरांकडे इतके दिवस महापालिकेने लक्षच दिले नसेल का, असे अनेक प्रश्न नागरिक विचारत आहेत.
(फोटो- ११सीटीआर ०९)
जळगाव शहरातील शनी मंदिराकडे लेंडी नाल्यावरील रेल्वे पुलाच्या खालून जाणारा रहदारीचा रस्ता वाढत्या अतिक्रमणामुळे अरुंद झाला आहे.