लोकमत न्यूज नेटवर्क
शिरसोली : कोरोनामुळे काही दिवसांपासून शिरसोली प्र.बो.मध्ये बुधवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी आठवडे बाजाराचे विभाजन करून दोन्ही गावात हा बाजार भरविण्यात यावा, अशी मागणी आता होत आहे.
सध्या शिरसोली प्र.बो. येथील आठवडे बाजारात बुधवारी बाजार भरत असतो. सध्या गावाची लोकसंख्या ३५ हजारांपेक्षा जास्त असल्याने या बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. बाजारात विक्रेत्यांना जागा पुरत नसल्याने अनेक विक्रेते हे जळगाव-नांदगाव या मार्गाच्या दोन्ही बाजूला दुकान लावून बसलेले असतात. या रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ राहत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यातच सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे.
भविष्यातील अपघाताचा धोका टाळण्यासाठी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिरसोली प्र.बो. व शिरसोली प्र.न. या दोन्ही गावांमध्ये स्वतंत्र बाजार भरविण्यात यावा, अशी मागणी होत आहे. या निमित्ताने शिरसोली ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळण्याचा स्त्रोतही उपलब्ध होणार आहे.