अमळनेर : संविधानात असलेल्या न्यायपूर्ण, समाजवादी, समतावादी अधिकारांवर गदा येत असून शब्दांना असलेले मूल्य संपत चालले आहे. म्हणून संविधान धोक्यात असून कायद्याची विल्हेवाट लावणे सुरू आहे. संविधानातील एक एक भाग वाळवी लागल्यासारखा पोखरला जात आहे, अशी खंत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली.राष्ट्रसेवा दल, छात्रभारती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुरोगामी विचार मंचाच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ विवेक जागर कार्यक्रमांतर्गत ‘भारतीय संविधान धोक्यात?’ या विषयावर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. अनेक वर्षांनंतर प्रथमच मेधा पाटकर व प्रतिभा शिंदे एकत्र आल्या.रमेश लंकेश्वर, राजेंद्र चौधरी, प्रा.राजेंद्र वैद्य, दिनेश संकलेच, दिनेश वाल्हे, गुलाब शिंगाणे, उदय कापुरे, अजित शेख, जगदीश तावडे या चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या समरणार्थ व्यख्यान आयोजित केले होते.पाटकर पुढे म्हणाल्या की, संविधानातील मूल्ये जपण्यासाठी व कर्तव्ये पार पाडण्यासाठी आपण एकत्र येत आहोत. संविधानातील लिहिलेल्या गोष्टींचे पालन होत नसेल तर आपल्याला लढावेच लागेल. शिक्षणातील व्यापक विचारांवरील हल्ल्यांबाबत गांभीर्याने विचार करावा लागेल. हे सरकार १४४ कायदे रद्द करू पाहत आहे. म्हणून एकता आणि एकजूट ठेवावी. तसेच २९ रोजी बहुजन क्रांती मेर्चातर्फे भारत बंद व ३० रोजी अहिंसा साखळी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. आमदार अनिल पाटील, माजी उपजिल्हाधिकारी एच.टी. माळी, साहित्यिक कृष्णा पाटील, सानेगुरुजी वाचनालायचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, कामगार संघटनेचे सोमचंद संदनशिव, एस.डी. देशमुख, बन्सीलाल भागवत, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, भारती गाला, गो.पी.लांडगे, रत्नदीप सिसोदिया, वीज कर्मचारी संघटनेचे पी.वाय. पाटील, वसुंधरा लांडगे, मंगला पवार, प्रदीप पाटील, डॉ. रवींद्र पाटील, धनगर पाटील, डॉ.जयश्री पाटील, रणजित शिंदे, उदय खैरनार, गौतम सपकाळे, कैलास बहारे, रवी पांडे, प्रा.लीलाधर पाटील, सानेगुरुजी स्मारक समितीच्या कार्यवाह दर्शना पवार यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या.