मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : साधारण १५ ऑक्टोबरनंतर राज्यातील साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू होतात. जिल्ह्यातही याच काळात मुहूर्त साधला जातो. गेल्या वर्षी एकमेव मुक्ताई शुगर एनर्जी साखर कारखान्याने गळीत हंगाम पूर्ण केला होता आणि यंदाही गळीतच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील उर्वरित साखर कारखान्याचे जाते येत्या गळीत हंगामात फिरणार की नाही याबाबत साशंकता आहे. सहकारी कारखाने चालू होण्यास आर्थिक बूस्टरची गरज आहे.जिल्ह्यातील साखर कारखानदारीत अग्रगण्य असलेल्या फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटात सापडल्याने गेल्या वर्षीही बंद होता व यंदा येथेही गळीत हंगाम होईल, अशी स्थिती दिसून येत नाही.दुसरीकडे चोपडा साखर कारखानाही आर्थिक कोंडीबाहेर पडू न शकल्याने बंद आहे. चाळीसगावच्या बेलगंगा साखर कारखान्याच्या राजकारणातून अनेकांचे राजकीय भविष्य उज्वल झाले. मात्र अनेक वर्षांपासून कारखाना व कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधःकारमय आहे. रावेर कारखाना खाजगी कंपनीकडे जाऊनही चालू शकला नाही. यामुळे जिल्ह्यातील सहकारी तत्वावरची साखर कारखानदारी बुडत्या स्थितीला येऊन ठेपली आहे.शासनाने सहकारी साखर कारखाने टिकविण्यास आर्थिक मदत दिली तरच जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारी चालू होईल. अन्यथा कारखाने आणि कर्मचारी यांचे भविष्य अंधारात आहे.अवसायनात गेलेल्या मुक्ताईनगर येथील साखर कारखाना मुक्ताई शुगर अँड एनर्जी या खासगी कंपनीकडे गेल्याने त्याला चांगले दिवस आले आहे. कारखान्याने मागील ६ गळीत हंगाम यशस्वी पूर्ण केले असून, वीज निर्मितीसह प्रकल्पही यशस्वी झाला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात एकमेव मुक्ताईनगरचा हा कारखाना सुरू होता. करखान्याने १०.६७ चा उतारा साध्य केला होता. यंदा जिल्ह्यात ऊस आहे. मात्र मुक्ताई शुगर वगळता अन्य कारखाने सुरू होतील याबाबत साशंकता आहे. यामुळे मुक्ताई शुगर व्यवस्थापनाचा उत्साह दुणावला आहे. २५ मेट्रिक टन प्रति दिवस क्षमता असलेल्या या कारखान्यात २०२० - २१ च्या गळीत हंगामात ५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातून १०.५ टक्के उतारा गाठून पाच लाख २५ हजार क्विंटल साखर उत्पादन होईल तर १२ मेगा व्हॅट वीज निर्मिती होईल, असा विश्वास कारखान्याचे व्हाईस चेअरमन ऍड. रोहिणी खडसे व कार्यकारी संचालक देवरे यांनी व्यक्त केला.
साखर कारखान्यांसाठी आर्थिक बुस्टरची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2020 4:08 PM