जळगाव : अकरावी कला शाखेचे प्रवेश सुरू आहेत; पण पुरेसे विद्यार्थी मिळत नाहीत. त्यामुळे कला शाखा जिवंत ठेवण्यासह शिक्षक अतिरिक्त ठरू नयेत म्हणून शासनाने तातडीने कला शाखेची विद्यार्थी संख्येची अट ५० टक्केपर्यंत शिथिल करण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने (जुक्टो) करण्यात आली आहे.
संघटनेने म्हटले आहे, की जेमतेम पास झालेले विद्यार्थीही विज्ञान शाखेत प्रवेश घेत असल्याने कला शाखेकडे बघण्याची विद्यार्थी आणि पालक वर्गाची नकारात्मक भूमिका या शाखेच्या मुळावर उठली आहे. ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयातदेखील कला शाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी उत्सुक नाहीत. आजतागायत कोणत्याच कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेतील विद्यार्थी संख्या पूर्ण झालेली नाही.
क्षमता विचारात न घेता प्रवेश...
स्वयंअर्थसाहाय्य तत्त्वावरील कनिष्ठ महाविद्यालये जेमतेम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता लक्षात न घेता सरसकट विज्ञान शाखेत प्रवेश देत असल्याने कला शाखेला घरघर लागलेली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काही वर्षांपूर्वी वाणिज्य शाखेबाबत अशीच अवस्था निर्माण झाली होती. त्यावेळी शासनाने विद्यार्थी संख्येची अट शिथिल केली होती.
आताही शासनाने विनाविलंब कला शाखेची विद्यार्थी संख्येची अट शिथिल करून ही विद्याशाखा जिवंत ठेवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. नंदन वळींकार, सचिव प्रा. सुनील सोनार, प्रा. डॉ. अतुल इंगळे, उपाध्यक्ष प्रा. गजानन वंजारी, मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड, प्रा. डी. डी. पाटील, प्रा. शैलेश राणे, कार्याध्यक्ष प्रा. सुनील पाटील, महानगराध्यक्ष प्रा. राहुल वराडे, जळगाव ग्रामीणचे अध्यक्ष प्रा. सुधाकर ठाकूर यांनी केली आहे.
ग्रामीण, शहरीमधील एवढे विद्यार्थी कमी करा
वरिष्ठ महाविद्यालयांना संलग्न असलेल्या शहरी भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संख्या १२०वरून ६० आणि ग्रामीण माध्यमिकला संलग्न असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयांत ८०वरून ४० करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा येत्या दिवसांत विद्यार्थी संख्येअभावी शिक्षकवर्ग अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. त्यामुळे अंशतः अनुदानित तत्त्वावरील शिक्षक आपली नोकरी कायमची घालवून बसतील याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
अकरावीला २४,३२० जागा
जळगाव जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त शाखा मिळून अकरावीची एकूण प्रवेशक्षमता ४९,०८० आहे. यामध्ये कला शाखेची मंजूर विद्यार्थी संख्या २४,३२० आहे.