सर्वांनीच स्वयंचलित यंत्रांशी, मोबाईलसह लॅपटॉप वा टिव्हीशी छान जुळवून घेतलेय, त्यांच्याशी खास दोस्ती करत आम्ही दिवसातील ३ ते ४ तासही घालवतोय. वेळ नाही ‘म्हणत इतर गोष्टींवर खूपसा वेळही खर्ची करतोय. पण घरीदारी ‘संवाद’ साधायचंच विसरत चाललोय. विज्ञानाने जग खूप खूप जवळ आलेय. पण माणसा-माणसातील संवाद कमी होत चाललाय. आणि ‘संवाद’ हा तर मानवतेचा मुख्य आधार आहे. या आधारवडाला प्रेम, सहकार्य, त्याग इत्यादी भावनांच्या पारंब्या फुटून मानवता विस्तारत गेली, फुलत आणि फळतही गेली. याच आधारवडाच्या आधाराने विज्ञान आणि तंत्रज्ञान विस्तारत गेले. परंतु आज त्याच विज्ञानानेच आता भाषेची गरज खुंटवीत आणली आहे. घरी दूरदर्शन,मोबाईल वा इतर स्वयंचलित यंत्रांमुळे एका माणसाला दुसऱ्या माणसाशी बोलण्याची गरज कमी झालीयं, सहकार्याची भावना झपाट्याने ओसरत आहे. त्याच बरोबर प्रेम, करूणा, त्याग, सेवावृत्ती, संघप्रवृत्ती वगैरे मानवतेच्या खुणाही (हळूहळू) नष्ट होत चालल्याय. घराघरातील मुलांच्या अंगी अनेक सुप्तगुणांचा खरच खजिना असतो. त्याचप्रमाणे काही अवगुण असतात. काही कमतरताही असतात. पण या सर्वांची उकल केव्हा होते हो ? जेव्हा आपण मुलांशी संवाद साधतो तेव्हा ! अहो, मुलांना बोलायचं असतं, काहीतरी सांगायचं असतं. त्यांना आपल्या भावना, आपले विचार, आपल्या आठवणी सांगावच्या असतात. प्रश्न विचारत उत्तरं हवी असतात. तेव्हा मुलांशी बोला, संवाद साधा, त्यांचे प्रश्न (त्यांच्या वयोगटानुसार) समजून घ्या. त्यांना न कंटाळता उत्तर द्या. त्यांच्यासाठी वेळ द्या.. असे वाटते.- चंद्रकांत भंडारी
गरज आहे ‘पालक-पाल्य’ संवादाची !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:34 PM