जळगाव - शेती व्यवसाय सध्या अडचणींचा होतोय. विदर्भ, खांदेशात गेल्या 2-3 वर्षात बोण्डअळीच्या संकटाने हाती आलेले सर्व पीक उद्ध्वस्त होतंय. उत्पादकता कमी होतेय. आज शेतकरी संकटात आहे. केळीच्या पिकावरही बाहेरील रोग उभा राहतोय. त्यामुळे नगदी पिकांवरील या संकटांबाबत वेळीच उपाययोजना आवश्यक आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. पंजाबातही गव्हावर तांबेरा रोगाचे थैमान सुरू झाले असल्याचेही ते म्हणाले. जळगाव येथे जैन व्हॅली येथे पद्मश्री. डॉ. आप्पासाहेब पवार कृषी पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते.पवार पुढे म्हणाले की, दिल्लीत एका सत्ताधारी मंत्र्याने मला विचारले, पवार साहब आप हमेशा पैदा करनेवालेकी बात करते हो लेकीन लाखो खानेवाले है... त्याला पवार म्हणाले, बराबर है, लेकीन पैदा करनेवाला उद्ध्वस्त हुआ तो खानेवाला क्या खायेगा? शेतकरी जगला तरच आपण सारे जगू, असे सूचविल्याचे ते म्हणाले.शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, त्याशिवाय इतर सर्व तत्वज्ञान व्यर्थ आहे. त्यामुळे शेतीमालाला योग्य भाव मिळेल, याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यायला हवी, आशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. जर शेतीच्या प्रश्नांकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर पुन्हा निकृष्ट, परदेशी मिलो खाण्याची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही, अशी भीतीही पवार यांनी व्यक्त केली.फूड इन्फलेशन ... शेतमालाचे भाव वाढले तर महागाई वाढते. खतांच्या किंमती वाढल्या तर महागाई कमी होते, ही राजधानीतील तज्ञ मंडळींची विचारधारा व मानसिकता बदलण्याची गरज आहे. दिल्लीत काहीही उगविले, पिकविले जात नाही मात्र, दिल्लीकरांना सर्व स्वस्तात हवे असते. शेतीप्रश्नांची, बळीराजाच्या समस्यांची राजधानीतील नागरिकांना जाणीव नसल्याचे पवार यांनी नमूद केले.चांदवडसारख्या दुष्काळी तालुक्यातून शेतीत उत्तम काम करणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान होतोय, ही आनंदाची बाब आहे. आप्पासाहेब पवार व भंवरलालजी यांना हेच अपेक्षित होते. जैन समूहाने ही आधुनिक पीक क्रान्ती गावोगावी न्यावी, असेही पवार यांनी सूचविले.जळगावात जैन हिल्स वर येऊन गेल्या अनेक वर्षांतील स्नेही भंवरलालजी यांच्याशी आता संवाद होऊ शकत नाही, याचे मोठे दुःख असल्याचेही पवार म्हणाले.
पिकांवरील संकटांबाबत वेळीच उपाययोजना आवश्यक- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 2:09 PM