लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान गरजूंना देण्यात येणाऱ्या मोफत शिवभोजन थाळीचे जिल्ह्याचे इष्टांक दीडपटीने वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शनिवार, १७ एप्रिल रोजी दिले. यामुळे आता जिल्ह्यातील ३८ केंद्रांवरून दररोज पाच हजार १२५ थाळ्याचे वितरण होणार आहे. १४ मेपर्यंत हा वाढीव इष्टांक राहणार असून त्यानंतर तो पूर्ववत होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान विविध व्यवहार बंद असल्याने राज्य सरकारच्यावतीने मजूर, स्थलांतरित, बेघर इत्यादींसाठी मोफत शिवभोजन देण्याची घोषणा केली. त्यानुसार सध्या जिल्ह्यातील ३८ केंद्रांवरून ३ हजार ५०० थाळ्यांचे वाटप सुरू आहे. मात्र या थाळ्या कमी पडत असल्याने अनेक जण माघारी परतत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १५ एप्रिल रोजी आदेश काढून प्रत्येक केंद्राच्या थाळीचा इष्टांक दीडपट करण्यात यावा, असा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातदेखील याची अंमलबजावणी आता होणार आहे. यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश काढून जिल्ह्यातील ३८ शिवभोजन केंद्रांचा पूर्वी दिलेला इष्टांक दीडपट करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता या ३८ केंद्रांवरून ५ हजार १२५ थाळ्यांचे दररोज मोफत वितरण होणार आहे.
१४ मेपर्यंत वाढीव थाळ्या
सध्या जळगाव शहरात १६ व जिल्ह्यात इतर तालुक्यांमध्ये २२ अशा एकूण ३८ केंद्रांवरून शिव भोजन वाटप केले जाते. शिव भोजनच्या वाढीव थाळ्यांचे आदेश देतानाच या ठिकाणी या नियमावलीचेदेखील पालन करावे, असे आदेशात म्हटले आहे.
जळगाव शहरात मिळणार १,८६८ थाळ्या
जळगाव शहरातील १६ केंद्रांवरून सध्या १ हजार २५० शिवभोजन थाळ्यांचे वितरण केले जात आहे. आता दीडपट वाढीमुळे १ हजार ८६८ थाळ्या दररोज वितरित होणार आहेत.