२४ सीटीआर ६५
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेच्या माजी नगरसेविका अश्विनी देशमुख यांना नुकतेच नेल्सन मंडेला नोबेल पीस अकॅडमी पुरस्कार व अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट (सोशल सायन्स) पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. महानगरपालिकेत नगरसेविका असताना विविध राष्ट्रविकास व सामाजिक मूल्यांचा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविल्यामुळे देशमुख यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुणे येथील कोरिंथिअंस क्लब अँड रिसॉर्टमधील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ तथा प्रायमिनिस्टर वेल्फेअर स्कीमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रल्हाद मोदी यांच्या हस्ते नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार, तर ऑक्सफर्ड पार्लमेंट ऑफ वर्ल्ड चेअरमन तथा चीफ रेक्टर प्रो. डॉ. मधू क्रिष्णन यांच्या हस्ते मानद डॉक्टरेट देण्यात आली व नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. डॉक्टरेट मिळाल्याबद्दल डॉ. अश्विनी विनोद देशमुख यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार वंदना चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वागत केले आहे. महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून काम करीत असताना डॉ. अश्विनी देशमुख यांनी त्यांचा वाॅर्ड संपूर्णपणे ‘कचरामुक्त’ करून दाखविला होता, तसेच आपल्या प्रभागातील दररोज एक तास नागरिकांना घरातील टीव्ही, फ्रीज, एसी, कूलर हे विजेवर चालणारी उपकरणे बंद ठेवून ब्लॅकआऊट मोहीम यशस्वी करून दाखविली होती.