जळगाव : ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या खातेदारांची संख्या वाढत असून जळगाव जनता बँकेने नेट बँकिंगसाठी सुरक्षेच्या दृष्टीने लागणारे निकष जवळपास पूर्ण केले असून लवकरच बँकेची नेट बँकिंग सुविधा सुरू होणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अनिल राव यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली. यावेळी काही सभासदांनी विद्यमान संचालक मंडळास त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन केले.
छत्रपती संभाजीराजे नाट्य संकुलात जळगाव जनता सहकारी बँकेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजाच्या गरजा पूर्ण करण्यावर बँकेचा भर
सामाजिक गरज ओळखून बँक आपले धोरण ठरवत असते व त्या अनुषंगाने समाजाच्या गरजा पूर्ण करण्यावर बँकेचा भर असतो, असे अनिल राव यांनी सांगितले. कोरोना काळात दिलेल्या योगदानाबद्दल कर्मचारी वर्गाचे त्यांनी कौतुक केले. ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून ऑनलाईन फ्रॉडचे देखील प्रमाण वाढत आहे यासाठी ग्राहकांना जागरूक करण्यासाठी अभियान राबविले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. महिला सक्षमीकरणासाठी करण्यात येत असलेल्या कार्याची तसेच सभासदांच्या आरोग्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या सुविधांची माहिती देण्यात आली.
सूत्रसंचालन संचालक डॉ. अतुल सरोदे यांनी केले. लेखापाल प्रकाश पाठक यांचा सत्कार अनिल राव यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील व संचालक जयेश दोशी, बन्सीलाल अंदोरे, सतीश मदाने , सुरेश केसवाणी, दीपक अट्रावलकर, रवींद्र बेलपाठक, जयंतीलाल सुराणा, सुभाष लोहार, विवेक पाटील, डॉ.अतुल सरोदे, हरिश्चंद्र यादव, सावित्री सोळुंखे, डॉ. आरती हुजुरबाजार यांनी विविध विषयांचे वाचन केले व त्यास उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. यावेळी तज्ज्ञ संचालक विद्याधर दंडवते व आमंत्रित संचालक नितीन झंवर, लता इंगळे,कर्मचारी प्रतिनिधी हेमंत चंदनकर, ओंकार पाटील, संचालक कृष्णा कामठे उपस्थित होते. उपाध्यक्ष डॉ. प्रताप जाधव यांनी आभार मानले. या वेळी बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला,केशवस्मृती सेवासमूहाचे अध्यक्ष भरत अमळकर तसेच माजी संचालक व व्यासपीठावर बँकेच्या विविध शाखांचे शाखा विस्तार समिती सदस्य व सभासद उपस्थित होते.
फोटो कॅप्शन - वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अनिल राव