सुशील देवकर जळगाव : देशभरात ईव्हीएमवरील मतदान घेण्यास विरोधकांकडून विरोध होत असतानाच अधिक उमेदवार उभे करून मतपत्रिकेवर मतदान घेण्यास भाग पाडण्याची हालचाल काही उमेदवारांनी सुरू केली होती. मात्र शासनाने अत्याधुनिक ईव्हीएमचा वापर सुरू केला असून त्यामुळे एका मतदार संघात ३८४ उमेदवार उभे राहिले तरी ईव्हीएमवर मतदान घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे ईव्हीएमविरोधातील हालचालींना खीळ बसली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.लोकसभा निवडणुकीत राज्यात अनेक ठिकाणी ६४ उमेदवार क्षमतेचे ईव्हीएम वापरले गेले होते. मात्र विधानसभेला सर्वच ठिकाणी अत्याधुनिक एम-३ ईव्हीएम वापरण्यावर भर जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानात घोळ होत असल्याचा विषय देशपातळीवर चर्चिला जात आहे. त्यासाठी काही मतदार संघांमधील विजयी व पराभूत उमेदवारांच्या मतांमधील फरकाचे आकडे देखील सारखे असल्याचे उदाहरणे दिली जात आहेत. निवडणूक आयोगाने हे सर्व आरोप फेटाळत मतपत्रिकांवर निवडणूक घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे विरोधकांकडून मतपत्रिकेवर निवडणूक व्हावी यासाठी वेगळीच शक्कल लढविली जात आहे.माजी आमदार अनिल गोटे यांनी ईव्हीएमला आव्हान देत मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी एकाच मतदारसंघातून थेट ३८५ उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी चालविली आहे. त्यांची यादी देखील तयार असल्याचे समजते.३८५ उमेदवार उभे करण्याची तयारीएका ईव्हीएम मशिनवर १६ उमेदवारांसाठी मतदान होऊ शकते. त्यात उमेदवार वाढल्यास त्यास आणखी ३ मशिन जोडता येत होती. म्हणजे चार मशिन जोडून ६४ उमेदवारांसाठी ईव्हीएमद्वारेच मतदान घेणे शक्य होते. २०१४च्या निवडणुकीत ही ६४ उमेदवारांसाठी मतदान घेण्याची क्षमता असलेले ‘एम-२’ग्रेडची यंत्रच वापरण्यात आली होती. मात्र त्यावेळी या मतदानयंत्रांबाबत राजकारण्यांमध्ये फारशी सजगता नव्हती. मात्र जेव्हा ईव्हीएमला विरोध सुरू झाला तेव्हा ६५ उमेदवार उभे करून मतपत्रिकेवर मतदान घेणे भाग पाडले जाऊ शकते, हे लक्षात आल्याने ही मर्यादा ३८४ उमेदवारांपर्यंत वाढवलेले ‘एम-३’ दर्जाचे आधुनिक ईव्हीएम गत लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आले. मात्र ही संख्या पुरेशी नसल्याने सोलापूरसह अनेक जिल्ह्यात जुनी एम-२ दर्जाची ईव्हीएम वापरण्यात आली. आता विधानसभा निवडणुकीसाठी देशभरातून अत्याधुनिक ईव्हीएम आणून त्याद्वारेच मतदान घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे २४ ईव्हीएम जोडले जाऊ शकतात. त्यामुळे ईव्हीएम विरोधकांना एका मतदारसंघात ३८५ उमेदवार उभे करावे लागणार आहेत.ईव्हीएमची क्षमता ३८४ उमेदवारांची असून ३८५ उमेदवार उभे केल्यास मतपत्रिकेवर मतदान होऊ शकते. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. -अनिल गोटे,माजी आमदार, धुळे.पूर्वी १६ उमेदवार क्षमतेचे ४ मशिन जोडून एका मतदार संघात ६४ उमेदवारांसाठी ईव्हीएमद्वारे मतदान घेतले जाऊ शकत होते. मात्र आधुनिक एम-३ प्रकारच्या ईव्हीएममध्ये २४ मशिन जोडून ३८४ उमेदवारांसाठी मतदान घेणे शक्य आहे. मतपत्रिका असो अथवा ईव्हीएम प्रशासनाला निवडणूक आयोगाच्या आदेशानुसारच निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.-डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी, जळगाव.
मतपत्रिकेवर मतदान टाळण्यासाठी नवीन ईव्हीएम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:40 PM