भडगाव,दि.6- तालुक्यात यंदा मक्याची लागवड मोठय़ा प्रमाणावर झाली आहे. मका कापणीसाठी मजुर मिळेनासे झाल्याने ‘मका तोडून द्या आणि चारा घेवून जा’ असा नवा फंडा शेतक:यांनी वापरण्यास सुरुवात केल्याने जनावरांना हिरवा चारा मोठय़ा प्रमाणावर मिळू लागला आहे.
यंदा पाण्याच्या उपलब्धतेमुळे सर्वच पिके चांगली बहरली. यात मका पिकाचे मोठय़ाप्रमाणावर उत्पन्न हाती आले आहे. जनावरांना मोफत हिरवा चारा मिळत असल्याने पशूमालकांना सोयीचे ठरत आहे.
अनेक ठिकाणी मका पिकाचे कणीस परिपक्व स्थितीत आहेत. यामुळे ते पिक काढणे आवश्यक झाले आहे. शेतक:यांना मका तोडणी, कापणीसाठी मजूर वेळेवर मिळत नाही. मिळालेच तर मजुरी अधिक असते. यामुळे मका तोडणीचा खर्च शेतक:यांना अधिक लागत असल्याने शेतकरीवर्गाने ‘मका कणसे तोडून द्या आणि शेतातून चारा मोफत कापून न्या’ नवीन फंडा सुरु केला आहे. यामुळे शेतक:यांना मका कापणी, तोडणीचा खर्च वाचत आहे तर जनावरांनाही हिरवा चारा मिळत आहे. यामुळे पशूमालकांची चा:याची अडचण दूर होत आहे.