जळगाव : भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील २६५ गावांचा जल जीवन मिशन योजनेत नव्याने समावेश करुन या योजनांच्या खर्चासाठी लागणाऱ्या ५८ कोटी १६ लाख रुपयांच्या निधीस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली.
पालकमंत्रीस्तरीय जल जीवन मिशन समितीची बैठक अजिंठा विश्रामगृहात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
सुधारित आराखडाजिल्ह्यातील कोणत्याही गावास पाण्याची टंचाई भासू नये याकरीता यापूर्वीच जिल्ह्यातील ८३८ गावांचा जलजीवन मिशन योजनेत समावेश करण्यात आला असून त्याकरीता ९४७ कोटी ७३ लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. आता नव्याने २६५६ गावांचा समावेश केल्याने जिल्ह्यातील १ हजार १०३ गावांचा समावेश जलजीवन मिशन योजनेत होणार असून याकरीता १ हजार ५ कोटी ८९ लाख रुपयांचा सुधारित आराखडा होणार असल्याने बैठकीत या आराखड्यासही मंजुरी देण्यात आली.
नव्याने समावेश केलेल्या गावांची तालुकानिहाय संख्या
मुक्ताईनगर-१७, अमळनेर-२८, भडगाव-५, भुसावळ-११, बोदवड-१७, चाळीसगाव-१४, चोपडा- ३३, धरणगाव- २१, एरंडोल-१०, जळगाव- ८, जामनेर-२४, पाचोरा-१५, पारोळा-१८, रावेर-३१, यावल-१३ असे एकूण २६५ गावांचा समावेश करण्यात आला असून यात ९८ गावांमध्ये रेट्राफिटींग तर १६७ गावांमध्ये नवीन योजना राबविण्यात येणार आहे. या योजना पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील १ हजार १०३ गावांना मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.