लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या संथ गतीने सुरू असले तरी मंगळवारपासून महामार्गावरून जाणाऱ्या आयएमआर ते अग्रवाल चौक यादरम्यानच्या दोन नव्या लेन खुल्या झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी काम वेगात सुरू होते.
आधी भराव टाकला गेला. नंतर खडी पसरविण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले. दोन्ही लेन आता खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यावरून वाहनांची ये-जा सुरू झाली आहे. अग्रवाल चौकाजवळ रिंगरोडकडे जाणाऱ्या रस्त्याला ही लेन जोडण्यात आली आहे, तसेच दुसरी लेनदेखील मु.जे.कडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत तयार करण्यात आली आहे.
सालारनगरात खडी हटविली
महामार्गाच्या बाजूला सालारनगरात खडी पसरवून ठेवण्यात आली होती. ही खडी या ठिकाणी अपघाताला निमंत्रणच देत होती. त्याबाबतची तक्रार परिसरातील रहिवासी फारुक शेख यांनी केली होती. हलिमा अपार्टमेंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही खडी टाकण्यात आली होती. त्यावर डांबरीकरण करावे किंवा खडी काढून घ्यावी, अशी मागणी शेख यांनी जिल्हाधिकारी राऊत आणि महामार्ग प्राधिकरणाचे सिन्हा यांच्याकडे केली होती. त्यावर महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ खडी हटविली आहे.