लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, इतर कार्यक्रम, सभा आणि बैठकांसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार या कार्यक्रमांना आता स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घ्यावी लागणार आहे.
गुरुवारी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार, धार्मिक कार्यक्रम, दिंडी, यात्रा पालखी सोहळ्याला बंदी घालण्यात आली आहे. तर मिरवणूक काढण्यास देखील परवानगी नाही. गर्दी न होणाऱ्या कार्यक्रमांसाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व स्थानिक पोलीस स्टेशनची परवानगी घ्यावी लागणार आहे. स्थानिक पातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना ५० पेक्षा अधिक लोकांची गर्दी होणार नाही. या अटीवर परवानगी देण्याची कार्यवाही संबंधित उपविभागीय दंडाधिकारी व कार्यकारी दंडाधिकारी यांनी करावी.
सांस्कृतिक कार्यक्रमांना सभागृहाच्या एकूण बैठक क्षमतेच्या ५० टक्के मर्यादा निश्चित केली आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर स्थानिक पोलीस ठाण्याला केवळ सूचित करावे लागणार आहे.
क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांचा अभिप्राय घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमांना गर्दी होणार नाही. याची दक्षता परवानगी देणाऱ्या प्राधिकरणाला घ्यावी लागणार आहे. तसेच त्यासाठी इतर मार्गदर्शक तत्त्वेदेखील जारी करण्यात आली आहे.