नशिराबाद : येथील कुंभार दरवाजाजवळील विद्युत वीज ट्रान्सफाॅर्मर (डीपी)मध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे घरोघरी विद्युत उपकरणे जळाली होती. तब्बल चोवीस तास वीजपुरवठा खंडित होता. सोमवारी सकाळपासूनच वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांनी युद्धपातळीवर कार्यवाही करून नवीन ट्रान्सफाॅर्मरची जोडणी केली. त्यामुळे सोमवारी सायंकाळनंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला असल्याची माहिती सहायक अभियंता पवन वाघुळदे यांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, ट्रान्सफाॅर्मरमध्ये झालेल्या अचानक बिघाडामुळे घरोघरी टीव्ही, फ्रीज, मिक्सर, लाईट आदी विद्युत उपकरणे जळाली आहेत. त्याची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. त्यासंदर्भात सोमवारी करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये सुमारे पावणेदोनशे ठिकाणी उपकरणे जळाली असल्याची माहिती समोर आली. अजूनही सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगण्यात आले.
नशिराबादचे तरुण ग्रामपंचायत आखाड्यात
वातावरण तापू लागले : इच्छुकांची भाऊगर्दी
नशिराबाद: ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजताच येथे अनेक इच्छुकांनी भाऊगर्दी करायला सुरुवात केली आहे. तरुणांनी गुडघ्याला बाशिंग बांधून मैदानात उतरण्याकरिता व्यूहरचना करणे, निवडणुकीमध्ये यश संपादन करण्यासाठी आतापासूनच बैठका आदींबाबतचे नियोजन सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये इच्छुकांमध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. यंदा आपण निवडून येऊन, या जोशात तरुणवर्ग पुढे सरसावला आहे. एकाच वाॅर्डात अनेकांची भाऊगर्दी आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात परिवर्तन घडविणार, अशी चर्चा रंगत आहे. त्यामुळे गावातील राजकीय ज्येष्ठ, श्रेष्ठ मंडळी यात सहभागी होऊन तरुणांना मार्गदर्शन करीत आहेत. तालुक्यातील मोठे गाव म्हणून नशिराबादचा लौकिक आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी कोणी स्वतंत्र तर अनेक जण पॅनल पद्धतीत सहभागी होऊन नशीब अजमावण्यासाठी मैदानात उतरत आहेत. कसं काय ताई बरं आहे ना, राम राम अशी विचारणा गल्लोगल्ली आस्थेवाईकपणे आता होताना दिसत आहे. त्यामुळे निवडणूक आली... असं नागरिक म्हणत आहेत. गावातील मूलभूत समस्यांसह पाणी, गटारी, शौचालय, रस्ते आदी समस्यांचा ऊहापोह आव्हानात्मक ठरणार आहे.