लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : म्युकरमायकोसिस हा शब्दही तेव्हा सर्वांसाठी अगदीच नवा, वैद्यकीय क्षेत्रातील मोजक्या मंडळींना याची कल्पना. अशावेळी कोविडमधून बऱ्या झालेल्या आईला प्रचंड डोकेदुखीचा त्रास होणे, ‘लोकमत’मधील म्युकरमायकोसिसचे वृत्त वाचण्यात येणे आणि या भयंकर अशा आजाराचे लवकर निदान होऊन आईने त्यावर मात करणे... ज्येष्ठ पत्रकार शांता कमलाकर वाणी वय ७३ या दीड महिन्याच्या उपचारानंतर म्युकरमायकोसिस या आजारातून बऱ्या होऊन मुंबईहून घरी परतल्या आहेत.
शांता वाणी यांना कोविडची लागण झाली होती. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ४ एप्रिल रोजी डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज घ्यावा, असे सांगितले. मात्र, त्यांना डोकेदुखीचा प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे कुटुंबीयांनी त्या दिवशी डिस्चार्ज घेतला नाही.
दुसऱ्या दिवशी ‘लोकमत’मध्ये म्युकरमायकोसिस हा आजार कसा फैलावत आहे, याची लक्षणे, निदान य सर्व बाबींची नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी दिलेली विस्तृत माहिती कमलाकर वाणी यांच्या वाचनात आली. लक्षणे सारखी वाटत असल्याने त्यांनी तातडीने मुलगा राजेश यावलकर यांना संपर्क करून डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे सांगितले. त्यांनी डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्याशी संपर्क करून त्यांनी सांगितल्यानुसार सीटी स्कॅन करून घेतला. स्थानिक कान, नाक, घसा तज्ज्ञांचा सल्ला घेतला. अन्य ठिकाणीही ते रिपोर्ट पाठविले. विविध तपासण्या केल्या. त्यानंतर मुंबईच्या खासगी रुग्णालयातील डॉ. मिलिंद नवलखे यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी तातडीने मुंबईला घेऊन येण्याचा सल्ला दिला. त्यानुसार शांता वाणी यांना तातडीने मुंबई येथे हलविण्यात आले. त्या ठिकाणी विविध चाचण्या करून ६ तासांची शस्त्रक्रिया करून अखेर ही बुरशी काढण्यात आली. स्थानिक डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी मार्गदर्शन केले. शिवाय कॅनडातील डॉ. कोठोडे हेसुद्धा सातत्याने संपर्कात होते व औषधोपचारांबाबत मार्गदर्शन करीत असल्याचे राजेश यावलकर यांनी सांगितले. आईचे वय ७३ असूनही कोरोनानंतर म्युकरचे हे मोठे संकट आल्यानंतरही ती खंबीर राहिली व तिने यावर मात केली. त्यामुळे आजारांना घाबरून न जाता त्याचा धैर्याने सामना करा, असा संदेश त्यांनी यातून दिला आहे.
तर गुंतागुंत वाढली असती
शांता वाणी यांना म्युकरची लागण झाल्यानंतर या बुरशीचा प्रवास डोळे व टाळूकडे सुरू झाला होता. त्यांना अगदी काही तासही मुंबईला जायला उशीर झाला असता तर त्यांचा डोळा काढावा लागला असता, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे लवकर निदान होऊन तातडीने उपचार सुरू झाल्याने यावलकर कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
नंतर चिंता, मात्र इच्छाशक्ती प्रबळ
शांता वाणी यांना मधुमेह व रक्तदाबाच्या त्रासाने नंतर चिंता वाढली होती. या ठिकाणी कमलाकर वाणी हे पूर्णवेळ रुग्णालयात थांबून होते. तर त्यांचे डोंबिवली येथील चिरंजीव नीलेश यावलकर हे रोज रुग्णालयात येत असत, यासाठी दर दोन दिवसांनी त्यांना ॲन्टिजन टेस्ट करावी लागत होती. हळूहळू शांता वाणी या औषधांना प्रतिसाद देऊ लागल्या व काही कालांतराने त्यांची प्रकृती स्थिर झाली. अशा गंभीर आजारातून बऱ्या होऊन त्या मंगळवारी जळगावात पोहोचल्या.