कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असो किंवा उच्च शिक्षण विभाग सर्वच ठिकाणी सध्या महत्वाच्या पदांवर प्रभारी राज सुरू आहे. त्यामुळे प्रभारीचं सध्या शिक्षण विभागांचा गाडा हाकताना दिसून येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जळगाव जिल्ह्याला लागलेले प्रभारी राजचे ग्रहण सुटतान दिसून येत नाही.
मनपा शिक्षण मंडळाचे तत्कालीन प्रशासन अधिकारी यांच्याकडे तब्बल चार ते पाच तालुक्याचा अतिरिक्त पदभार होता. दुसरीकडे उच्च शिक्षण सहसंचालक यांच्याकडेही औरंगाबाद आणि जळगाव कार्यालयाचा पदभार आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील आयटीआयमध्ये सुध्दा प्राचार्यांची पदे रिक्त आहे. त्यामुळे नियमित प्राचार्यांवर इतर संस्थांचे पदभार सोपविण्यात आले आहे. सोबतचं विद्यापीठात कुलगुरू, प्र-कुलगुरू तसेच कुलसचिव देखील प्रभारीचं आहे. मध्यंतरी प्रभारी प्र-कुलगुरू व कुलसचिव यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या जागीच प्रभारीवर प्रभारी अधिका-यांची नेमणूक करण्यात आली होती. जिल्हा परिषद शिक्षण विभागात देखील प्राथमिक शिक्षणाधिकरी व उपशिक्षणाधिकारी पदे ही प्रभारीचं आहेत. उपशिक्षणाधिकारीसाठी चार वर्षांपूर्वी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, त्याचा अद्यापही निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. एकंदरीत प्रमुख पदांवर प्रभारी राज सुरू आहे. यामुळे अनेकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रभारी राजचे ग्रहण सोडविण्यात यावे, अशी मागणी होत आहे. बाहेर जिल्ह्यातील अधिका-यांकडे जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पदांचा पदभार देण्यात येतो. परिणामी, दोन्ही कार्यालयांचा पदभार सांभाळणे गरजेचे असल्यामुळे तीन दिवस एका जिल्ह्यात तर तीन दिवस ज्या ठिकाणी नियुक्ती मिळाली त्या जिल्ह्यात अधिकारी थांबतात. मात्र, काही वेळेस अधिका-यांना अतिरिक्त मिळालेल्या नियुक्ती ठिकाणी जाणे शक्य होत नाही. परिणामी, नागरिकांचे काम रखडले जाते. त्यामुळे अधिकारी जागेवर मिळत नाही, अशा तक्रारी नेहमीच ऐकायला मिळतात. त्यामुळे रिक्त जागांवर नियमित अधिकारी देण्यात यावेत, अशी मागणी होताना दिसून येत आहे.