उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहाराच्या अनुदानाची रक्कम ही थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ केवळ दीडशे रूपयांसाठी एक हजार रूपयांचे बँक खाते उघडणे हे परवडणारे नाही. त्यामुळे विविध संघटनांसह पालकांकडून सुध्दा या निर्णयाचा जोरदार विरोध होत आहे़ तरीही अनुदानासाठी बँक खाते उघडण्याची सक्ती का केली जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. काहींनी हा निर्णय रद्द व्हावा, यासाठी निवेदनेही दिली.
जळगाव जिल्ह्यातील ४ लाख ६६ हजार ५७३ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा लाभ मिळतो. पोषण आहार विद्यार्थ्यांना दरवेळी प्रत्यक्ष दिला जातो. मात्र, उन्हाळी सुट्टीतील अर्थात केवळ मे महिन्यातील पोषण आहार प्रत्यक्ष न देता, त्या आहाराची अनुदानाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे पालक खाते काढण्यासाठी पाल्यांना बँकामध्ये घेवुन जात असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दोनश ते तीनशे रुपयांचा रोज बडवून खाते उघडण्यासाठी जावे लागत असल्यामुळे मोल-मजुरी करणा-यांनी नागरिकांनी सुध्दा या निर्णया संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. सुट्टीतील ३५ दिवसांचे अनुदान इयत्ता पहिली ते पाचवी करिता १५६ रुपये तर इयत्ता सहावी ते आठवी करिता २३४ रुपये अनुज्ञये ठरणार आहे. त्यामुळे दीड रूपयांच्या निधीकरिता एक हजार रूपयांचे बँक खाते परवडणारे नाही, अशी ओरड पालकांकडून होवू लागली आहे. ही रक्कम न देता, नेहमीप्रमाणे पोषण आहार देण्यात यावे अन्यथा पालकांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बँक खाते उघडण्याची सक्ती करू नये व या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा, अशीही मागणी तज्ज्ञांकडून होत आहे. आधीच गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र, पालकांची खाते उघडण्यासाठी बँकांमध्ये गर्दी होत आहे. अजूनही कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही. त्यामुळे कोरोनाची होण्याची शक्यत देखील नाकारता येत नाही. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार होणे गरजेचे आहे.