विनाकारण रस्त्यावर येऊ नका, घरातच थांबा असे आवाहन केले जात असले तरी जळगाव शहरात काहींकडून त्याला हरताळ फासण्याचेच काम होताना दिसत आहे. मात्र, आता जिल्हा पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाने हाती घेतलेल्या ‘थेट रस्त्यावरच चाचणी’ मोहिमेमुळे काही प्रमाणात का होईना, पण विनाकारण फिरणाऱ्यांवर वचक बसणार आहे.
कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला आहे. त्यास रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून संचारबंदी लागू केली आहे. असे असतानासुध्दा अनेक जण विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना आढळून येतात. परंतु, आता विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच अँटिजन टेस्ट केली जाणार आहे. त्यात पॉझिटिव्ह आढळणाऱ्या व्यक्तीस लागलीच कोविड केअर सेंटर येथे उपचारार्थ दाखल केले जाईल. परिणामी, त्या बाधितामुळे इतर कुणालाही कोरोनाची लागण होणार नाही. सद्यस्थितीला कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यामुळे काही जण रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठीदेखील जात नाही. पण, आता विनाकारण फिरणाऱ्यांची थेट रस्त्यावच अँटिजन टेस्ट केली जाणार असल्यामुळे रात्रीच्या वेळी संचारबंदीत फिरणाऱ्यांवर पोलिसांचा चांगलाच वचक बसणार आहे. त्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या तर कमी होईल. पण चाचणी केल्यामुळे पॉझिटिव्ह आढळून आलेल्या व्यक्तीकडून इतर कुठल्याही व्यक्तीला लागण होणार नाही. अर्थात कोरोनाची चेन तोडण्यास मदत होईल. पोलिसांनी राबविलेली ही मोहीम सुरूच ठेवावी, असेही काही तज्ज्ञांचे म्हणणे. दररोज हजारावर कोरोनाबाधित आढळून येत आहेत. दुसरीकड़े बरे होणाऱ्यांचे प्रमाणसुद्धा समाधानकारक आहे.