सुनील पाटील
अंतर्गत राजकारणाने खाकी कलंकित
राजकारण हे राजकीय लोकांपुरता मर्यादित राहिलेले नाही, ते आता सरकारी कार्यालयांमध्येही दिसून येत आहे. शिस्तीचे खाते समजल्या जाणाऱ्या पोलीस, राज्य उत्पादन शुल्क व आरटीओ या तीनही खाकीतील विभागात अंतर्गत राजकारण इतके वाढले आहे की, त्यामुळे खाकीच कलंकित होऊ लागली आहे. एकंदरीत बहुतांश राजकारणात अर्थकारण हेच समोर आलेले आहे. या अंतर्गत राजकारणाने लाचलुचपत विभागामार्फत अनेकांचा काटा काढल्याचे उदाहरणे मावळत्या वर्षात बघायला मिळाले तर काही जणांवर गुन्हे दाखल झाले. आपसातील राजकारण हे काही जणांनी थेट परिवारापर्यंतही नेल्याच्या घटना घडत आहेत. लाच घेणे आणि देणे हा गुन्हाच आहे. आपण धुतल्या तांदळाचे आहोत, असे ठामपणे सांगायला पोलीस खात्यात अपवादवगळता कोणीच पुढे येणार नाही. ज्या ज्या प्रकरणात पोलीस कर्मचारी असो की अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेला आहे, तेथे नक्कीच टोकाचे राजकारण झाल्याचे नंतर समोर आले आहे. महसूल विभागदेखील त्यात मागे नाही, एका बड्या अधिकाऱ्याच्या प्रकरणात दुसऱ्याच अधिकाऱ्याने हस्तकामार्फत लाचकांड घडवून आणल्याची नंतर चर्चा झाली होती. आरटीओ कार्यालयातदेखील सध्या असेच राजकारण सुरू झाले आहे. गुन्हे दाखल होऊन किंवा पोलिसात तक्रारी होत असल्याने दोष नसलेल्या कुटुंबाला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यातून शेवट हा नुकसानीचाच होत आहे. हे असले राजकारण कुठे तरी थांबले पाहिजे, असे काहींना वाटत असले तरी काही जण त्यात आणखी मिठाचा खडा टाकण्याचा उपद् व्याप करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे जनमानसात विभागाची प्रतिमा मलिन होत चालली आहे. अंतर्गत माहिती बाहेर पोहोचवली जात आहे. पोलीस खात्यातील अंतर्गत राजकारणाने तर अनेकांची वर्दीच उतरविली आहे, असे असले तरी त्यात संबंधितांच्याही चुका झालेल्याच आहेत, त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आजही अर्थकारणावरून पोलीस दलातील काही विभागात अंतर्गत कलह सुरूच आहे. ‘ज्याचा हात मोडतो, त्याच्या गळ्यात पडतो’ असे आपल्याकडे बोलले जाते. पण अशी वेळच येऊ नये यासाठी खबरदारी घेतली गेली तर बऱ्याच बाबींना आळा बसू शकतो. एकोप्याने व सर्वांना विश्वासात घेऊन कार्य केले तर विभागात वातावरण चांगले राहण्यासह काम करण्याचे बळ मिळते व जनमानसात खाकीची प्रतिमा अधिक उंचावू शकते. नव्या वर्षात तसा संकल्प करावा हीच अपेक्षा !