नाट्य स्पर्धा या हौशी कलाकारांसाठीचे, प्रायोगिक नाटके सादर करण्यासाठी व त्यातून स्वत:च्या अंगभूत गुणांना विकसीत करून प्रदर्र्शित करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ राज्य शासनाने निर्माण करून दिलेले आहे. पण त्याचबरोबर अनेक उत्तमोत्तम नाट्य-समिक्षक ही या माध्यमातून कळत-नकळत घडविले गेलेले आहेत व त्यांना ही त्यांच्या पुढील आयुष्यात अनेक सकारात्मक बदल आणि सामाजिक सांस्कृतीक स्तरावर मानाचे स्थान मिळाल्याचे मी पाहिले व स्वत: परिक्षक आणि वृत्तपत्रीय समीक्षक या दोन्हीही नात्यातून अनुभवलेले आहे आणि म्हणूनच या विषयावर काही तरी लिहावेसे वाटले म्हणून ह्या लेखाची मांडणी करीत आहे. तसेच हा लेख लिहिताना इथे प्रायोगिक रंगमंचावरील नाट्य - समीक्षा -वृत्तपत्रीय लिखाण हा विषय डोळ्यासमोर ठेवलेला आहे. व्यावसायिक नाट्य समीक्षा हा विषय नाही. खरे तर वृत्तपत्रीय नाट्य-समीक्षा - एक तारेवरची कसरत या ऐवजी वृत्तपत्रीय नाट्य समीक्षा एक दृष्टीकोन किंवा वृत्तपत्रीय कसरत या ऐवजी शिर्षक द्यावा हा मनात विचार होता. पण रोज संध्याकाळी सात वाजता सुरू होणारा नाट्य-प्रयोग रात्री ९.३० ते १० पर्यंत बघून लगेचच लिखाण करण्यासाठी होणाऱ्या तातडीची धावपळ पाहून व लगेचच सकाळी त्यास प्रसिद्धी देण्याच्या-वाचकापर्यंत पोहोचविण्याच्या वृत्तपत्राच्या स्पर्धातून इर्षेमुळे कधी-कधी उथळ स्वरुपात ही समीक्षा प्रसिद्ध होण्याचा हा धोका असतोच परंतु स्पर्धात्मक युगामुळे ही तारेवरची कसरत वृत्तपत्रीय समीक्षणासाठी करावी लागते. खरे तर अशा घाईघाईने लिहून घ्याव्या लागणाºया समीक्षणामुळे ते समीक्षण पुरेसे कसदार आणि गुणवत्तापूर्ण असेलच असे नाही. (पूर्वार्ध)
-चंद्रकांत अत्रे