आपण समाजाचे काही देणे लागतो हे ध्यानात ठेवून समाजाप्रती उतराई होण्याचा प्रयत्न जळगाव येथील डॉ.रणजित चव्हाण करत आहे. त्यांचे वडील मालोजीराव आनंदराव चव्हाण यांचे मार्च २००४ मध्ये निधन झाले. वडिलांच्या वाढदिवशी स्मृतिप्रित्यर्थ समाजाला काही वेगळे देण्याचा संकल्प केला. त्यातून साकारला स्मृतिगंध हा कार्यक्रम.गेली १४ वर्षे सातत्य आणि कार्यक्रमाचा दर्जा राखल्याने ‘स्मृतिगंध’ सातत्याने सादर होत आहे.यंदाचे हे पंधरावे वर्ष होते. हिंदी चित्रपट संगीतात आपला वेगळा ठसा उमटवलेल्या एसडी बर्मन आणि आर.डी.बर्मन यांची अविस्मरणीय गीते लक्षात घेऊन एस.डी. ते आर.डी. असा मोठा स्पॅन असलेला आगळा वेगळा कार्यक्रम गेल्या रविवारी आयोजित केला गेला. डॉ.रणजित, उर्मिला आणि जयश्री या भावंडांनी वडिल मालोजीराव चव्हाण यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कोणतीही भाषणे न होता थेट कार्यक्रमास प्रारंभ झाला. औरंगाबादच्या डॉ.अनघा मारोवार आणि पुण्याचे प्रशांत नासेरी या दोनच गायकांनी औरंगाबादच्या वाद्यवृंदाची साथ घेत मंचाचा ताबा घेतला.‘दिन ढल जाये’ या एस.डी. बर्मन यांच्या संगीताने नटलेल्या अविस्मरणीय गीताने प्रशांत नासेरींनी प्रारंभ केला आणि नंतर एसडी, आरडी यांची गाईडमधील पिया तोसे नयना लागे रे, कागज के फूलमधील कक्त ने किया क्या हसीन गम, इजाजत मधले कतरा कतरा प्रेमपुजारीचे रंगीला रे, जीवन के सफरमे राही, आनेवाला पल जानेवाला है, चिंगारी कोई भडे, व्दंव्द गीतात दे दो मेरा पाच रूपैया बारा आना, आंधीचे तुम आ गये हो नूर आ गया है, अच्छाजी मै हारी चलो मान जाओ ना, कोरा कागज था ये मन मेरा अशा अनेक जुन्या एकाहून सरस गीते सादर होत असताना वन्स मोअरची दाद आली तेव्हा निवेदक प्रफुल्ल माटेगावकर यांनी वन्समोअरऐवजी वन मोअर गीत होऊ द्या अशी रसिकांना विनंती केली. दोन गीतांमध्ये मोजक्या शब्दात निवेदन करताना संबंधीत गीतांच्या आठवणी दाद देणाऱ्या होत्या. रसिकांनी खच्चून भरलेल्या या कार्यक्रमास तरूणांपेक्षा पन्नाशी उलटलेल्या रसिकांची लक्षणीय संख्या आणि त्यांनी गाण्यांना मनापासून दिलेली दाद, प्रत्येक गीत ऐकताना रसिकांना आपल्या तारूण्याची झालेली याद यातच कार्यक्रमाचे यश आहे. मनात आले तर जयंती पुण्यतिथी किती वेगळेपणाने साजरी करता येते याचे हे आदर्श उदाहरण आहे.-विजय पाठक, जळगाव
समाजाचे उतराई होण्याचा आगळा प्रयत्न ‘स्मृतिगंध’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 3:46 PM