लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दाम्पत्याचा दोरी किंवा साडीने गळा आवळून खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता उघडकीस आली. तत्पूर्वी बुधवारी मयत मुरलीधर यांनी मुलीला साॅरी म्हणत मद्य प्राशन न करण्याबाबत सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी थेट आई - वडिलांचा मृतदेहच दिसल्याने मुलीने एकच आक्रोश केला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसुंबा येथील ओम साई नगरात मुरलीधर पाटील व त्यांच्या पत्नी आशाबाई असे दोघेच राहात होते. मोठी मुलगी शीतल हिरालाल पाटील (२४, रा. वेले, ता. चोपडा) ही कुसुंबा येथे, तर लहान मुलगी स्वाती उमेश पाटील (२२, रा. सावखेडा, ता. यावल) ही नंदुरबार येथे वास्तव्याला आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजता स्वाती ही आई वडिलांना फोन करत होती. परंतु त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे तिने याच परिसरात राहणारी आजी रुक्माबाई लक्ष्मण पाटील हिला फोन करून आई, वडिलांशी संपर्क होत नाही, काय झाले आहे ते जाऊन बघ, असे सांगितले. त्यानुसार रुक्माबाई यांनी जावई संतोष पाटील (रा. कुसुंबा) यांना सोबत घेऊन मुरलीधर पाटील यांचे घर गाठले. यावेळी घराचा मुख्य दरवाजा आतून बंद होता, तर किचनकडील मागील दरवाजा उघडा होता. बाजूच्या खोलीत आशाबाई मृतावस्थेत पडलेले होती हे दृश्य पाहून रुक्माबाई व संतोष पाटील यांना धक्का बसला. त्यांनी घराची पाहणी केली असता कपाट उघडे होते, तर गच्चीवर मुरलीधर पाटील हेदेखील मृतावस्थेत दिसून आले. पती - पत्नीचा खून झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.
रिक्षाचालकाशी दोन वेळा वाद
घटनास्थळावर आलेले मुरलीधर पाटील यांचे भाऊ विलास राजाराम पाटील व साडू संतोष पुंडलिक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मुरलीधर पाटील यांचा बुधवारी दुपारी आणि रात्री रिक्षाचालकाशी दोन वेळा वाद झाला होता. त्यामुळे या वादाचा आणि घटनेचा काही संबंध आहे का? याची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे.
दोन वर्षांपूर्वी चोरी अन् वाद
मुरलीधर पाटील यांची मुलगी शीतल यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी जुन्या घरात वास्तव्याला असताना शेजारी राहणाऱ्या एका जणाने त्यांच्या घरात ४० हजार रुपये रोख व दागिन्यांची चोरी केली होती. तेव्हा त्याच्याशी वडिलांचा वाद झाला होता. त्यावेळी पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. त्या वादाचाही या घटनेशी संबंध आहे का? याची माहिती पोलिसांकडून काढली जात आहे.
ब्रोकरकडे कामाला होते पाटील
मुरलीधर पाटील हे महाबळमधील दिलीप कांबळे या ब्रोकरकडे कामाला होते. शेती, प्लॉट यांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून त्यांना कमिशन मिळत होते. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात या भागात नवीन घराचे बांधकाम हाती घेतले होते. जुलै महिन्यात ते येथे वास्तव्याला आले होते. दोन मजली आलिशान घर त्यांनी या ठिकाणी बांधलेले आहे. या घरात फक्त पती-पत्नी असे दोघेच राहात होते.
अंगावरील पाच लाखांचे दागिने गायब
आशाबाई यांच्या अंगावर पाच लाखांचे दागिने होते. त्याशिवाय घरातील कपाटातदेखील काही रक्कम होती. हे दागिने व रक्कम गायब झाल्याची माहिती मुरलीधर पाटील यांचे साडू संतोष पाटील यांनी दिली.
मुलीचा आईशी वाद
सुप्रीम कॉलनीत राहणारी मुलगी शीतल हिचा आईशी आठ दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्याचा राग आल्याने आठ दिवसांपासून आई शीतलशी बोलत नव्हती. बुधवारी वडिलांनी मद्य प्राशन केल्यामुळे नंदुरबारला राहणाऱ्या बहिणीने शीतलला फोन केला व वडिलांना समजावून सांग, असे सांगितले होते. त्यानुसार शीतल हिने घरी येऊन वडिलांना दारु न पिण्याबाबत समजावून सांगितले, तेव्हा साॅरी म्हणून यापुढे दारु पिणार नाही, असे सांगितले. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता वडिलांना संपर्क केला असता तो झालाच नसल्याची माहिती शीतल हिने दिली. आईचाही मोबाईल बंद येत होता.
पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक प्रताप शिकारे, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, विशाल वाठोरे, रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले व सहकारी दाखल झाले. फाॅरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. सर्वात आधी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व गोविंदा पाटील यांनी घटनास्थळ गाठून वरिष्ठांना माहिती कळविली.