सुविधा : नव्या वर्षात पुण्याचीही सेवा सुरु होण्याची शक्यता
जळगाव : डीजीसीएच्या परवानगी नंतर जळगाव विमानतळावर बुधवारी सायंकाळी जळगावला विमानसेवा देणाऱ्या कंपनीतर्फे नाईट लँडिंगची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. ही प्रक्रिया प्रवाशांनी आनंद व्यक्त केला असून, दुसरीकडे २०२१ या वर्षात पुण्याचीही सेवा सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या वर्षांपासून जळगाव विमानळावरून मुंबई व अहमदाबादची सेवा सुरू झाल्याने जळगावही आता जगाशी जोडले गेले आहे. तसेच बहुप्रतीक्षेत असलेले नाईट लँडिंगचे कामही पूर्ण झाल्याने आता रात्रीदेखील जळगावला विमान उतरणार आहे. यामुळे इतर विमान कंपन्यांदेखील जळगावला सेवा देण्यासाठी अनुकूलता दर्शविणार आहेत. यामुळे जळगावही व्यापार व उद्योगासाठी अग्रेसर होऊन, यातून रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होणार आहे. त्या दृष्टी कोनातून भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नाशिकनंतर उत्तर महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे विमानतळ असलेल्या जळगाव विमानळाला आतापर्यंत ५० कोटींहून अधिक निधी दिला आहे. या निधीतून सध्या विमान बहुतांश विकासकामे देखील झाली आहेत. तर उर्वरित कामे प्रगती पथावर आहेत.
इन्फो :
कमी दृश्यता असतांनाही यशस्वी नाईट लँडिंग
विमानतळावर विमान उतरविण्यासाठी ५ हजार मीटर पर्यंतची दृश्यता असणे गरजेचे असते. मात्र,बुधवारी ही दृश्यता चार हजार मीटर पर्यंत होती. त्यामुळे अहमदाबादहुन सायंकाळी ४.३० वाजता जळगावला येणारे विमान कमी दृश्यता असल्यामुळे जळगावला आले नाही. त्यानंतर सायंकाळीही अशीच परिस्थिती होती.या वेळी सबंधित विमान कंपनीने डिजीसीएची तात्काळ परवानगी घेऊन, कमी दृश्यता असतांनाही यशस्वीरीत्या सायंकाळी ठीक पावणे सहा वाजता जळगावला विमान उतरविले. नाईट लँडिंग मुळे कमी दृश्यता असतांनाही यशस्वीपणे विमानाने लँडिंग केल्यामुळे अहमदाबादहून जळगावला आलेल्या प्रवाशांनी आनंद व्यक्त केला.दरम्यान, गेल्या रविवारीही विमानतळावर यशस्वीरित्या नाईट लँडिंग झाले असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
इतर सेवांबाबत दोन दिवसात विमानतळावर आढावा बैठक
नाईट लँडिंगची यशस्वी चाचणी झाल्यानंतर लवकरच कायमस्वरूपी रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याबाबत डिजीसीएकडून परवानगी देण्यात येणार आहे. तर नाईट लँडिंगमुळे इतर विमान कंपन्याही जळगावला येण्यासाठी उत्सुक आहे. संबंधित कंपन्यांनी त्या बाबतचे प्रस्तावही डिजीसीएकडे दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जळगाव विमानतळावरून पुणे, इंदूर या मार्गावरील सेवांबाबत विमानतळावर बैठक घेणार असल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली.
इन्फो:
विमानतळाची सुरक्षा अधिकच चोख
सध्या विमानळाची सुरक्षा चोख असली तरी, ही सुरक्षा अधिकच कडक होण्यासाठी विमान तळावर खास ऑस्ट्रियातून आयात केलेले दोन एक्स रे स्कॅनरची यंत्रणा उभारण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांसह त्यांच्याकडील सामानाची अधिकच कसून तपासणी होत आहे. परिणामी विमान तळाची सुरक्षा अधिकच चोख झाली आहे. तसेच अत्याधुनिक संगणकीय प्रणालीवर कार्य करणाऱ्या ''''रोजनबार''''या वाहनामुळे अग्निशमक यंत्रणेला आपत्कालीन परिस्थितीत संकटांवर मात करणेही शक्य झाले आहे.