नांदेड, ता. धरणगाव : नारणे येथील वाळूचा ठेका सुरू असताना अमळनेर तालुक्यातील धावडे शिवारात वाळूचा साठा करून ठेवण्यात आला आहे. हा वाळूसाठा वैध की अवैध याबाबतचे रहस्य मात्र गुलदस्त्यातच आहे.
धरणगाव तालुक्यातील नारणे येथील वाळूचा ठेका सुरू असताना नांदेड फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून एका शेतामध्ये शेकडो ब्रास वाळूचा साठा करून ठेवण्यात आला आहे. सद्य:स्थितीत नारणे येथील वाळूचा ठेका बंद झालेला आहे. हा वाळूसाठा अमळनेर तहसील कार्यक्षेत्राच्या सावखेडा तलाठी सजेच्या धावडे शिवारात अंतर्गत येतो. आजपावेतो सदर वाळूसाठा ‘जैसे थे’ पडून होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने डंपरांद्वारे वाळूची वाहतूक केली जात असल्यामुळे हा वाळूसाठा वैध की अवैध? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा साठा वैध असेल. रात्रीच्या वेळी वाळूची उचल का केली जात आहे, याबाबत सावखेडा भागाचे मंडळ अधिकारी गवळी यांच्याशी संपर्क साधून त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, हा साठा वाळूच्या मक्तेदाराचा असून त्यांनी साठा करण्याबाबत परवानगी मागितली असता त्यांना रीतसर परवानगी देण्यात आली आहे. मात्र, रात्री वाळूची वाहतूक होत आहे. याबाबत विचारणा केली असता सकाळी सूर्योदयापासून सांयकाळी सूर्यास्तापर्यंत वाळू वाहतुकीस परवानगी असते. रात्री वाहतुकीस परवानगी नसते असे मंडळ अधिकारी गवळी यांनी सांगितले. अद्यापही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळूसाठा पडून आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून रात्रीची वाळू वाहतूक बंद आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत दखल घेऊन या मागील खरा प्रकार काय तो उजेडात आणावा, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.
फोटो - सावखेडा तलाठी सजातील धावडे शिवारातील हाच तो वाळूचा साठा व रात्रीच्या वेळी केली गेलेली वाळूची उचल छायाचित्रात दिसत आहे.
-०१सीडीजे २