जळगाव : गेल्या आठवड्यापासून अनलॉक झाल्यानंतर महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे राज्यात सर्व मार्गावर बस सेवा सुरू करण्यात आली असून, आता जळगाव आगारातर्फे प्रवाशांची मागणी वाढल्यानंतर पुणे मार्गावरही रातराणी बसची सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच सोलापूर,लातूर, अकोला या मार्गावरही बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.
कोरोनामुळे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही शासनाने लॉकडाऊन जाहिर केल्यामुळे दीड महिना महामंडळाची सेवा ९० टक्के बंद होती. फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नागरिकांसाठीच बस सेवा सुरू होती. दीड महिना ही सेवा बंद असल्यामुळे महामंडळाच्या जळगाव विभागाचे १८ कोटींच्या घरात आर्थिक नुकसान झाले होते. मात्र, कोरोना रूग्ण संख्येचे प्रमाण कमी झाल्यानंतर, जळगाव विभागातर्फे ७ जूनपासून सर्व लांब पल्ल्याच्या मार्गावर बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई मार्गावरही रात्रीची बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, पुण्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण जैसे थे असतांना आणि त्यात प्रवाशांचीही मागणी नसल्यामुळे पुणे मार्गावर बस सेवा सुरू करण्यात आली नव्हती. परंतु, आता आठवडा भरापासून पुण्यातील कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर प्रवाशांमधुनही मागणी वाढल्यामुळे जळगाव आगारातर्फे पुणे मार्गावर शनिवार पासून रातराणी सेवा सुरू करण्यात आली आहे.
इन्फो :
सोलापूर, लातूर व अकोला मार्गावरही सेवा सुरू
जळगाव आगारातर्फे सर्वत्र कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर, पूर्वीच्या वेळापत्रकानुसार सोलापूर, लातूर, अकोला, माहुरगड, शेगाव या लांब पल्ल्याच्या मार्गावरही नियमित बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. सोलापूर येथे दररोज मुक्कामी बस पाठविण्यात येत आहेत. अनलॉक नंतर रेल्वे गाड्यांना आरक्षण मिळत नसल्यामुळे, प्रवाशांचा या मार्गावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
अनलॉक नंतर जळगाव आगारातर्फे पुणे मार्गावरही रातराणी सेवा सुरू केली आहे. या बसला ऑनलाईन आरक्षणाची सुविधा आहे. तसेच सोलापूर, लातूर, अकोला, माहुरगढ, शेगाव या लांब पल्ल्याच्या मार्गावरही जळगाव आगारातर्फे बससेवा सुरू करण्यात आली आहे.
प्रज्ञेश बोरसे, व्यवस्थापक, जळगाव आगार