मतीन शेख
मुक्ताईनगर : घरात आठरावे विश्व दारिद्र्य, महाविद्यालयात फी भरण्यासाठी पैसे नाही. शिक्षण घेण्यास स्वता कमवा आणि शिका याशिवाय पर्याय नव्हता.अशा परिस्थितीत कोथळी येथील नीलेश लढे याने शिक्षण घेत सी.ए. परीक्षा उत्तीर्ण केली आहे.विशेष म्हणजे या युवकाने सातवीपर्यंतचे शिक्षण कोथळी जि.प. शाळेतून घेतले. जि.प. शाळेतून शिक्षण घेणाऱ्या नीनिलेशच्या यशाने त्याच्या कुटुंबासह गुरुजन भारावले.कोथळी येथील जगन्नाथ पुंडलीक लढे मूळचे तळवेल, ता.भुसावळचे. घरची परिस्थिती हलाखीची. शिक्षणाची सोय नव्हती म्हणून ते तळवेल येथून मामाच्या घरी कोथळी आले. शिक्षण घेतानाच मामांचे छत्र हरविल्याने ते पोरके झाले. दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून त्यांनी संसार सुरू केला. आजही ते कोथळीच्या बेघर वस्तीत राहतात. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मुलगा नीलेश जगन्नाथ लढे याला शिक्षण देण्यास हतबल होते.सातवीपर्यंत कोथळी जि.प. शाळेत शिक्षण घेणारा नीलेश जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आज सी.ए. झाला आहे. माध्यमिक शिक्षण मुक्ताईनगरच्या जे.ई.स्कूलमध्ये घेतले तर महाविद्यालयिन शिक्षण जळगावच्या मू.जे.महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात शैक्षणिक फी भरण्यासही नीलेशकडे पैसे नव्हते. पहिल्या सत्रात सहा हजार रुपये उधारीने घेऊन भरले. नंतर दिवसा महाविद्यालयात शिक्षण आणि त्यानंतर बाहेर सी.ए.कडे काम करून मिळणाऱ्या जेमतेम मोबदल्यावर त्याने स्वतःचे शिक्षण पूर्ण केले आणि एकदा आलेले अपयश पचवत त्याने ४७८ गुण मिळवून सी.ए.ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली आहे.आपल्या यशाचे श्रेय तो उच्च माध्यमिक चे शिक्षक संजय देशमुख, के.एम.चौधरी यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शन ला देतो. जे.ई.स्कूलच्या इतिहासात तो दुसरा सी.ए.होणारा विद्यार्थी आहे.आजच्या विलासी सुविधा असणाऱ्या शिक्षण व्यवस्थेत जि.प.शाळेचा विद्यार्थीही सी.ए. होऊ शकतो हे नीलेशने करून दाखविले आहे.